श्रीवर्धन | अनिकेत मोहित
पौष पौर्णिमेला देव पारधीला जाण्याची श्रद्धेची परंपरा यंदाही मोठ्या भक्तिभावात पार पडली. पौष पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी ठीक सहा वाजता भैरवनाथ मंदिरातून देवाची पालखी विधीवत निघाली. पारंपरिक ढोलाच्या गजरात आणि भक्तांच्या उपस्थितीत पालखी मानकरी कुटुंबांच्या घरी नेण्यात आली.
पालखी मार्गक्रमण करत असताना अनेक मानकऱ्यांच्या घरी पालखी उतरवण्यात आली. दारोदारी नागरिकांनी देवाची आरती करून प्रार्थना केली. नवस-नवसाची माहिती सांगून देवाची विधीपूर्वक पूजा करण्यात आली. मानपानाची परंपरा जपली गेली आणि उपस्थित भक्तमंडळींसाठी चहापानाची व्यवस्था करण्यात आली.
संपूर्ण मार्ग फिरून झाल्यानंतर साळीवाडा विभागातून पालखी डोंगरावर नेण्यात आली. तेथे देवाचे प्राचीन स्थान असून त्या ठिकाणी पालखी स्थिरावली. देवाची ‘खुण’ म्हणून मोराचे पीस त्या स्थानी ठेवण्यात येते अशी परंपरा आहे. त्यानंतर रात्री सुमारे एक ते दीडच्या सुमारास पालखी पुन्हा भैरवनाथ मंदिरात परत आली.
माघ पौर्णिमेच्या दिवशी पुन्हा त्या स्थानी जाऊन देवाला परत आणण्याचा विधी पार पडणार आहे पालखी निघाल्यानंतर साळीवाड्यातून मार्गक्रमण करत नागरिकांच्या आरत्या स्वीकारत पेशवे आळी येथे आगमन होऊन देवाचे मानकरी असलेल्या कुटुंबांकडे पालखी उतरवून देवाचा मानपान करतील आणि तेथे देवाला नैवेद्य अर्पण करून पारंपरिक पद्धतीने देवाला चिलीम दाखवण्यात येईल.
श्रद्धा, परंपरा आणि भक्तिभावाने नटलेला देवाच्या पारधीला जाण्याचा उत्सव शांतता आणि उत्साहात संपन्न झाला आणि त्याच उत्साहात देव पारधीवरून येण्याचा उत्सव ही साजरा केला जाईल.
