आमदार निधीतून सातही गावांचा कायापालट करणार: शिवसेना विभागप्रमुख जगदीश सावंत यांचा संकल्प
सोगाव | अब्दुल सोगावकर
अलिबाग तालुक्यातील मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील मुशेत येथे रविवार, दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी ‘स्वच्छ सुंदर माझे गाव मुशेत’ या भव्य नामफलकाचे अनावरण मोठ्या उत्साहात संपन्न झाले. मुशेत येथील ज्येष्ठ ग्रामस्थ किशोर हडकर आणि शिवसेना (शिंदे गट) आवास उपविभाग प्रमुख धवल राऊत यांच्या हस्ते हा अनावरण सोहळा पार पडला.
विकासाचा महासंकल्प
याप्रसंगी बोलताना शिवसेना (शिंदे गट) आवास विभाग प्रमुख जगदीश सावंत यांनी गावांच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा मांडला. आमदार महेंद्र दळवी यांच्या आमदार निधीतून आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील सातही गावांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
सावंत पुढे म्हणाले की, ”मुनवली, सोगाव, चोरोंडे, मुशेत, मापगाव, बहिरोळे आणि बेलवली या सातही गावांमध्ये रस्ते, वीज, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी आमचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. अनेक विकासकामे पूर्ण झाली असून काही प्रगतीपथावर आहेत. येणाऱ्या काळात या परिसराचा चेहरामोहरा बदलण्याचा आमचा संकल्प आहे.”
या कार्यक्रमाला परिसरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. यामध्ये प्रामुख्याने जागृती सावंत, संघटक राजेंद्र घरत, शाखा प्रमुख जितेंद्र करंजूकर व प्रमोद दळवी, पोलीस पाटील चंद्रशेखर सुर्वे, गट प्रमुख उत्तम राऊत, हरिश्चंद्र हडकर, प्रतीक सावंत, सुनिता सावंत, मोहिनी सावंत, अश्विनी हडकर-करंदेकर, अशोक भाई करंदेकर, कमर सुलताना सैय्यद यांसह मुशेत पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी मुशेत ग्रामस्थांनी गावाच्या सुशोभीकरणासाठी करण्यात आलेल्या या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.
