• Fri. Mar 13th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई-गोवा महामार्गाच्या मनमानी कारभाराविरोधात आंबेवाडी नाक्यावर ‘साखळी उपोषण’ सुरू

ByEditor

Jan 6, 2026

मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही; आंबेवाडी, कोलाड, वरसगाव परिसरातील ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा

धाटाव । शशिकांत मोरे
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या कामात प्रशासनाकडून होणाऱ्या मनमानी कारभाराविरोधात आणि प्रलंबित मागण्यांसाठी आंबेवाडी, कोलाड व वरसगाव पंचक्रोशीतील जागरूक नागरिकांनी सोमवार, ५ जानेवारी रोजी आंबेवाडी बाजारपेठेतील स्व. द.ग. तटकरे चौकात साखळी उपोषण सुरू केले आहे. “जोपर्यंत आमच्या न्याय्य मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील,” असा ठाम निर्धार आंदोलकांनी यावेळी व्यक्त केला.

आंदोलकांच्या प्रमुख मागण्या:

  • अंडरपासची निर्मिती: आंबेवाडी-कोलाड-वरसगाव येथील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना २०० मीटर अंतरावर ‘अंडरपास’ (बोगदे) देण्यात यावेत.
  • सर्व्हिस रोडचे काम: अनेक दिवसांपासून रेंगाळलेले सर्व्हिस रोडचे काम तातडीने पूर्ण करावे.
  • सुरक्षा उपाय: महामार्गावरील उघड्या गटारांवर तातडीने झाकणे बसवण्यात यावीत.

अन्यायाविरोधात संताप

आंदोलकांचे म्हणणे आहे की, पेण, नागोठणे, लोणेरे आणि महाड या ठिकाणी रस्ता ओलांडण्यासाठी अंडरपासची सुविधा देण्यात आली आहे, मग आंबेवाडी-कोलाड परिसरावरच अन्याय का? याठिकाणी ७२ खेडेगावातील नागरिक, व्यापारी, रिक्षा आणि टेम्पो चालकांची मोठी वर्दळ असते. मात्र, अंडरपास नसल्याने नागरिकांना १ किमीचा वळसा घालून यावे लागते, ज्यामुळे वेळ आणि इंधन दोन्ही वाया जात आहे.

“हे ठिकाण विळा, इंदापूर, रोहा आणि खांब या चारही बाजूंच्या प्रवाशांसाठी मध्यवर्ती केंद्र आहे. अंडरपास नसल्याने सर्वांचे हाल होत आहेत. आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत उपोषण थांबणार नाही.”
— सुरेशदादा महाबळे
(माजी सरपंच, आंबेवाडी ग्रामपंचायत)

लोकप्रतिनिधींविरोधात नाराजी

या आंदोलनादरम्यान युवा नेते विश्वास बागुल यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींवर तीव्र शब्दांत टीका केली. “आमदार निवडून आल्यावर या भागाकडे फिरकले नाहीत. जर त्यांनी हा अंडरपासचा प्रश्न मार्गी लावला, तर मी अनवाणी चालत जाऊन त्यांचा सत्कार करीन,” असे आव्हान त्यांनी दिले.

या आंदोलनात माजी सरपंच सुरेशशेठ महाबळे, चंद्रकांत लोखंडे, गणेश शिंदे, महेंद्र वाचकवडे, संजय कुर्ले, दयाराम पवार, चंद्रकांत जाधव, समीर महाबळे, बबलु सय्यद, भाऊ गांधी, शब्बीर शेठ सय्यद, विजय बोरकर, मंगेश सरफळे, उदय खामकर, विश्वास बागुल, विष्णू महाबळे, बिंदास धनावडे यांच्यासह कोलाड परिसरातील असंख्य व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!