• Fri. Mar 13th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

शहापाडा धरण परिसरात बिबट्या असल्याची अफवा; अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचा वनविभागाचा इशारा

ByEditor

Jan 6, 2026

​पेण | विनायक पाटील
महाराष्ट्रातील विविध भागांत बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे सध्या भीतीचे वातावरण असतानाच, पेण तालुक्यातील शहापाडा धरणालगत असलेल्या ट्री हाऊस हायस्कूल परिसरात बिबट्या दिसल्याची चर्चा रंगली होती. मात्र, वनविभागाने तातडीने केलेल्या तपासणीत ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. “नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे आवाहन वनक्षेत्रपाल सपना सोनार यांनी केले आहे.

​गेल्या काही दिवसांपासून अलिबाग आणि महाड परिसरात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या. तसेच, २७ डिसेंबर २०२५ रोजी खारपाडा-सावरोली मार्गावर रेल्वेच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर, ५ जानेवारी २०२६ रोजी काश्मिरे ते शहापाडा धरण रस्त्यावर बिबट्या दिसल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली, ज्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.

​मंगळवारी, ६ जानेवारी २०२६ रोजी पुन्हा शहापाडा धरणाच्या खालच्या बाजूला असलेल्या ट्री हाऊस हायस्कूल परिसरात आणि विटभट्टी मजुरांनी बिबट्या पाहिल्याचा दावा केला. या माहितीची गांभीर्याने दखल घेत वनक्षेत्रपाल सपना सोनार व त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

​वनविभागाचा खुलासा

​वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसराची बारकाईने पाहणी केली. तेथे आढळून आलेल्या पाऊलखुणांची (Pugmarks) तपासणी केली असता, त्या बिबट्याच्या नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तो कोणताही हिंस्र प्राणी नसल्याची खात्री वनविभागाने केली आहे.

​”शहापाडा परिसरात बिबट्या असल्याची केवळ अफवा आहे. घटनास्थळी केलेल्या तपासणीत बिबट्याच्या खाणाखुणा आढळलेल्या नाहीत. नागरिकांनी भयभीत होऊ नये. तसेच, सोशल मीडियावरून चुकीची माहिती किंवा अफवा पसरवणाऱ्यांवर वनविभागाकडून कायदेशीर कारवाई केली जाईल.”
— सपना सोनार, वनक्षेत्रपाल, पेण

​वनविभागाच्या या स्पष्टीकरणामुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला, तरी अफवा पसरवणाऱ्यांविरोधात आता प्रशासनाने कडक पवित्रा घेतला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!