उरण | घनःश्याम कडू
उरण नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. महाविकास आघाडीने या निवडणुकीतून माघार घेतल्याने भाजपचे रवी भोईर यांची बिनविरोध निवड झाली. नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी या निवडीची अधिकृत घोषणा केली.
२१ सदस्यांच्या उरण नगरपालिकेत राजकीय समीकरणे अत्यंत चुरशीची आहेत. सभागृहात भाजपचे १२ तर महाविकास आघाडीचे ९ नगरसेवक आहेत. भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने महाविकास आघाडीने आपला उमेदवार रिंगणात न उतरवण्याचा निर्णय घेतला. रवी भोईर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
नुकत्याच झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर यांनी धुरा सांभाळली होती. आता उपनगराध्यक्षपद भाजपकडे गेल्याने नगरपालिकेत सत्तेचे एक वेगळे समीकरण पाहायला मिळणार आहे.
निवडणूक प्रक्रियेनंतर नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी सकारात्मक भूमिका मांडली. त्या म्हणाल्या की, “आजची सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. राजकारण निवडणुकीपुरते मर्यादित ठेवून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व नगरसेवकांनी एकत्र काम करणे गरजेचे आहे.”
नूतन उपनगराध्यक्ष रवी भोईर यांनीही विकासात्मक दृष्टिकोन व्यक्त केला. “उरण शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगराध्यक्षांनी पुढाकार घेतल्यास, भाजप त्यांना पूर्ण ताकदीने सहकार्य करेल,” असे आश्वासन भोईर यांनी यावेळी दिले.
रवी भोईर यांची निवड जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी नगरपालिका परिसरात मोठा जल्लोष केला. ढोल-ताशांच्या गजरात नवनिर्वाचित उपनगराध्यक्षांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, चंद्रकांत घरत, सुनील पाटील, हस्तीमल मेहता, दिनेश पाटील यांसह अनेक मान्यवरांनी भोईर यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
