• Fri. Mar 13th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

​मुंबई-गोवा महामार्गावर मोकाट गुरांचा सुळसुळाट; प्रवाशांचा जीव टांगणीला, जबाबदार कोण?

ByEditor

Jan 14, 2026

​कोलाड | विश्वास निकम
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून मोकाट गुरांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, ही गुरे अपघातांना निमंत्रण देत आहेत. विशेषतः कोलाड, सुकेळी ते वाकण या दरम्यान महामार्गावरच जनावरांनी ‘गोठण’ मांडले असून, या परिस्थितीला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.

​अपघातांच्या संख्येत वाढ

​मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील आंबेवाडी, कोलाड नाका, भिरा फाटा, तटकरे कॉम्प्लेक्स, कोलाड पोलीस चौकी, सुकेळी खिंड आणि वाकण पूल या ठिकाणी गुरांचे मोठे कळप रस्त्याच्या मधोमध बसलेले आढळतात. ही गुरे दिवसा जंगलात चरण्यासाठी जातात, मात्र सायंकाळी ७ वाजल्यानंतर सुरक्षित आसरा म्हणून थेट महामार्गाचा रस्ता पकडतात. रात्रीच्या अंधारात ही गुरे वाहनचालकांना दिसत नसल्याने भीषण अपघात घडत आहेत. यात जनावरे दगावण्यासोबतच वाहनचालकही गंभीर जखमी होत आहेत.

​शेतकरी आणि कुंपणांचा अडसर

​स्थानिक नागरिकांच्या मते, महामार्गालगतच्या शेतकऱ्यांच्या जमिनी धनदांडग्यांनी खरेदी केल्या आहेत. या जमिनींभोवती तारेचे भक्कम कुंपण घातल्यामुळे गुरांना चरण्यासाठी किंवा बसण्यासाठी जागा उरलेली नाही. परिणामी, ही गुरे महामार्गाच्या डांबरी रस्त्यावर ठाण मांडून बसतात. दुसरीकडे, गुरे मालकांनी त्यांना मोकाट सोडल्याने या समस्येत अधिकच भर पडली आहे.

“महामार्गावर गुरांच्या कळपामुळे प्रवासाला अडथळा निर्माण होतो. दुर्दैवाने एखाद्या वाहनामुळे गुरे जखमी झाली किंवा दगावली, तर त्यांचे मालक तत्काळ नुकसान भरपाई मागण्यासाठी धावून येतात. मात्र, याच गुरांमुळे जर वाहनचालकाचा अपघात झाला किंवा तो जखमी झाला, तर एकही मालक जबाबदारी स्वीकारायला पुढे येत नाही. प्रशासनाने यावर कडक उपाययोजना करणे गरजेचे आहे.”
दिनकर सानप (सामाजिक कार्यकर्ते)

​प्रशासनाकडून ठोस कारवाईची मागणी

​भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांना अचानक समोर येणाऱ्या गुरांचा अंदाज येत नाही. कोलाड पोलीस चौकी आणि पेट्रोल पंपासमोरच ही परिस्थिती असताना प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप जनतेतून होत आहे. संबंधित विभागाने या उनाड गुरांचा बंदोबस्त करून वाहनचालकांचा प्रवास सुरक्षित करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!