नागोठणे (प्रतिनिधी): आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी नागोठणे मतदारसंघातून राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे, सत्ताधारी महायुतीमधील मित्रपक्षांमध्येही उमेदवारीसाठी चुरस पाहायला मिळत असल्याने या मतदारसंघातील निवडणूक बहुरंगी होण्याची चिन्हे आहेत.
ठाकरे गटाची मरगळ झटकली
नागोठणे हा ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जात असे. मागील निवडणुकीत येथून किशोर जैन निवडून आले होते. मात्र, बदलत्या राजकीय परिस्थितीत जैन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाकडून सक्षम उमेदवार कोण? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला होता. आता स्वतः जिल्हा संपर्कप्रमुख आणि मागील विधानसभा निवडणुकीतील उमेदवार प्रसाद भोईर यांनी शड्डू ठोकल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश संचारला आहे.
महायुतीमध्ये उमेदवारीवरून पेच?
नागोठणे मतदारसंघावर महायुतीमधील तिन्ही पक्षांनी दावा सांगितल्याचे चित्र सध्या दिसत आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) गटातून विद्यमान सदस्य किशोर जैन यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. तर शिवसेना शिंदे गटातून सुमित काते यांनीही जोरदार मोर्चेबांधणी सुरू करत निवडणुकीची तयारी दर्शवली आहे. भाजपातर्फे सोपान जांभेकर यांच्या नावावर पक्षाकडून शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
युती-आघाडीच्या निर्णयाकडे लक्ष
जरी विविध पक्षांच्या उमेदवारांनी तयारी सुरू केली असली, तरी अंतिम उमेदवारी ही स्थानिक पातळीवर होणाऱ्या ‘युती’ आणि ‘आघाडी’च्या जागावाटपाच्या निर्णयावर ठरणार आहे. हा मतदार संघ नेमका कोणाच्या वाट्याला जातो आणि मित्रपक्ष एकमेकांना किती सहकार्य करतात, यावरच येथील विजयाचे गणित अवलंबून असेल.
जागावाटपात फेरबदल झाल्यास किंवा मित्रपक्षांनी बंडखोरी केल्यास ही निवडणूक अत्यंत बहुरंगी आणि चुरशीची होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात वरिष्ठ पातळीवरून होणाऱ्या राजकीय निर्णयांकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
