प्रशासनाच्या दिरंगाईमुळे गोवे परिसरातील उन्हाळी भातशेती संकटात; नुकसान भरपाईची मागणी
कोलाड | विश्वास निकम
रोहा तालुक्यातील गोवे आणि पुई परिसरातील शेतकऱ्यांसाठी जीवनवाहिनी असलेल्या महिसदरा कालव्याला पाणी सोडण्याचे आश्वासन पाटबंधारे विभागाने पाळले नसल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने दिलेली १५ जानेवारीची डेडलाईन उलटूनही पाणी न सुटल्याने उन्हाळी भातशेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली असून, याला जबाबदार कोण? असा सवाल शेतकरी विचारत आहेत.
नेमके प्रकरण काय? मुंबई-गोवा महामार्ग ६६ च्या चौपदरीकरणाच्या कामात पुई आणि गोवे गावाला पाणीपुरवठा करणारा चेंबर आणि मोरी तोडण्यात आली होती. यामुळे गेल्या वर्षी शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. त्यावेळी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर महामार्ग ठेकेदार आणि पाटबंधारे खात्याच्या सहाय्यक अभियंत्यांनी दुरुस्तीचे आश्वासन दिले होते. “पुढील वर्षी सर्व कामे मार्गी लावून पाणीपुरवठा पूर्ववत करू,” या अटीवर प्रशासनाने एक वर्षाचा अवधी मागून घेतला होता.
शेतकऱ्यांची पूर्वतयारी वाया यावर्षी पाणी सुटेल या आशेने शेतकऱ्यांनी शेतातील गवत काढणे, मशागत करणे अशी पूर्वतयारी पूर्ण केली होती. गोवे ग्रामपंचायतीने २६ डिसेंबर २०२५ रोजी रीतसर अर्ज देऊन पाणी सोडण्याची विनंती केली होती. त्यावर प्रशासनाने १० ते १५ जानेवारीच्या दरम्यान पाणी सोडले जाईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, आज २० दिवस उलटूनही कालवा कोरडाच असल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे.
पाईपलाईनचे काम अपूर्ण मोरीचे काम पूर्ण झाले असले तरी, काही ठिकाणचे पाईपलाईनचे व कालवा दुरुस्तीचे काम अद्याप प्रलंबित आहे. पाटबंधारे खात्याकडून होत असलेल्या टाळाटाळीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. आधीच अतिवृष्टीमुळे पावसाळी पिकांचे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यासमोर आता उन्हाळी पीकही हातातून जाण्याचे संकट उभे राहिले आहे.
“या परिसरातील शेतकरी अनेक वर्षांपासून दोन्ही पिके घेत आहेत. दोन वर्षांपासून पावसाने नुकसान केले आणि आता पाटबंधारे खात्याच्या दिरंगाईमुळे उन्हाळी शेती धोक्यात आली आहे. १५ जानेवारीपर्यंत पाणी सोडण्याचे आश्वासन हवेत विरले आहे. जर तात्काळ पाणी मिळाले नाही आणि भातशेतीचे नुकसान झाले, तर पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.”
-महेंद्रशेठ पोटफोडे (सरपंच, गोवे ग्रामपंचायत)
