महाड | मिलिंद माने
महाड तालुक्यातील राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. शिरगाव गावचे सरपंच आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हा समन्वयक सोमनाथ दिगंबर ओझर्डे यांच्यासह अक्षय भोसले आणि प्रतीक जगताप यांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. या निर्णयामुळे ओझर्डे यांचा आगामी जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला असतानाच, दुसरीकडे महाडमधील सत्ताधारी गटातील बड्या नेत्यांच्या अडचणी वाढल्याचे चित्र दिसत आहे.
नेमके प्रकरण काय?
महाड नगरपरिषद निवडणुकीच्या दरम्यान शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात जोरदार संघर्ष झाला होता. या राड्यानंतर महाड शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते. या वादात शिरगावचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी गुन्हेगारी प्रवृत्ती विरोधात आवाज उठवला होता. मात्र, याच काळात शिंदे गटाचे रोहन धेंडवाल आणि ओझर्डे यांच्यात झालेल्या शाब्दिक बाचाबाचीनंतर, ओझर्डे यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्यायालयीन लढा आणि दिलासा
माणगाव सत्र न्यायालयाने सोमनाथ ओझर्डे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. मात्र, त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असता, न्यायालयाने त्यांना दिलासा देत अंतरिम जामीन मंजूर केला. ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (जिल्हा परिषद व पंचायत समिती) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निकाल ओझर्डे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
’कुठे खुशी, कुठे गम’; बडे नेते निवडणुकीपासून वंचित राहण्याची शक्यता
सोमनाथ ओझर्डे यांना जामीन मिळाल्याने ठाकरे गटात उत्साहाचे वातावरण असताना, महाडमधील महायुतीमधील नेत्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नगरपरिषद राड्याच्या प्रकरणात अद्यापही काही प्रमुख नेते फरार असल्याचे समजते. यात प्रामुख्याने खालील नावांची चर्चा आहे:
विकास गोगावले: राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र (नाते जिल्हा परिषद गटातून इच्छुक).
निलेश महाडिक: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष.
धनंजय उर्फ बंटी देशमुख: पदाधिकारी.
पोलीस प्रशासनाने निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र देऊन कळवले आहे की, संबंधित फरार आरोपी किंवा त्यांचे प्रतिनिधी अर्ज भरण्यासाठी आल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी. यामुळे हे दिग्गज नेते निवडणुकीपासून वंचित राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
निवडणुकीचे गणित बदलणार?
सोमनाथ ओझर्डे हे करंजाडी (विन्हेरे) जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यांना मिळालेल्या कायदेशीर दिलासामुळे त्यांच्या विरोधकांपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. एकीकडे ओझर्डे यांचा मार्ग सुकर झाला असताना, दुसरीकडे मंत्रीपुत्र आणि सत्ताधारी गटाचे तालुकाध्यक्ष निवडणुकीच्या रिंगणाबाहेर राहण्याची शक्यता असल्याने महाड तालुक्यात ‘कभी खुशी कभी गम’ असे वातावरण पाहायला मिळत आहे.
