उमेदवारीसाठी लॉबिंगला वेग; गावपातळीपासून ते जिल्हा स्तरापर्यंत बैठकांचे सत्र
मुंबई । मिलिंद माने
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा तिसरा टप्पा आता निर्णायक वळणावर आला आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्याने संपूर्ण ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापले आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी आतापासूनच गावपातळीपासून ते थेट जिल्हा स्तरापर्यंत मोर्चेबांधणी सुरू केली असून, राजकीय तडजोडींना वेग आला आहे.
‘महायुती’ विरुद्ध ‘महाविकास आघाडी’ असा रंगणार सामना
या निवडणुकीत सत्तेचे समीकरण साधण्यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सत्ताधारी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची ‘महायुती’ विरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अशी ‘महाविकास आघाडी’ यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे. याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी कामगार पक्ष आणि स्थानिक आघाड्यांनीही आपले अस्तित्व टिकवण्यासाठी फिल्डिंग लावली आहे.
या १२ जिल्ह्यांमध्ये होणार निवडणूक
राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विविध समित्यांच्या सभापती पदासह पंचायत समितीच्या सभापती पदासाठी इच्छुकांची मोठी फळी तयार झाली आहे.
बैठकांचे सत्र आणि प्रलोभनांची खैरात
निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण भागात फार्म हाऊस, हॉटेल्स आणि गावागावांत बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी जत्रा, हळदीकुंकू समारंभ, मंदिर पूजा आणि क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून आश्वासनांची खैरात केली जात आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यात नोकरी-धंद्यानिमित्त गेलेल्या ‘चाकरमानी’ मतदारांना मतदानासाठी गावात आणण्यासाठीही उमेदवारांनी आतापासूनच संपर्क मोहिमा आखल्या आहेत.
निवडणूक : एका नजरेत (जागांचा तपशील)
१. जिल्हा परिषद (एकूण १२ जिल्हे)
एकूण जागा: ७३१
महिला आरक्षण: ३६९
अनुसूचित जाती (SC): ८३
अनुसूचित जमाती (ST): २५
नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC): १९१
सर्वसाधारण प्रवर्ग: ६३
२. पंचायत समिती (एकूण १२५ समित्या)
एकूण जागा: १,४६२
महिला आरक्षण: ७३१
अनुसूचित जाती (SC): १६६
अनुसूचित जमाती (ST): ३८
नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC): ३४२
खुला प्रवर्ग: १८५
सत्तेसाठी सध्या गावागावांत नातेवाईक आणि सगे-सोयरे यांच्या गाठीभेटी वाढल्या असून, तरुणांपासून ते अनुभवी राजकारण्यांपर्यंत सर्वच जण घराघरांत जाऊन मतदारांचे आशीर्वाद घेत आहेत.
