उपतालुकाप्रमुख मनोज खांडेकर यांचा करिष्मा; ३० वर्षांचा रस्त्याचा प्रश्न सुटल्याने मतदारांचा वाढता पाठिंबा
नागोठणे | किरण लाड
महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून नागोठणे जिल्हा परिषद गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे. ऐनघर ग्रामपंचायत हद्दीतील गणपतवाडी आणि धनगरवाडी येथील शेकडो ग्रामस्थांनी शिवसेना (शिंदे गट) उपतालुकाप्रमुख मनोज खांडेकर यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत आणि जिल्हा परिषद उमेदवार सुमित काते यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे सुमित काते यांची या गटातील स्थिती अधिक मजबूत झाली असल्याचे चित्र दिसत आहे.

३० वर्षांचा वनवास संपला: सुमित कातेंकडून रस्त्याचे काम पूर्ण
मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या सुकेळी गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गणपतवाडी आणि धनगरवाडी या आदिवासी वाड्या गेली ३० वर्षे पक्क्या रस्त्यापासून वंचित होत्या. ७०० ते १००० लोकसंख्या असलेल्या या वस्तीमध्ये रस्ता नसल्याने आजारी रुग्ण किंवा गर्भवती महिलांना दवाखान्यात नेण्यासाठी चक्क ‘डोली’चा वापर करावा लागत होता. अनेक वर्षे केवळ आश्वासने पदरी पडलेल्या या ग्रामस्थांची व्यथा मनोज खांडेकर यांनी समजून घेतली.

खांडेकर यांच्या सूचनेनुसार, युवा उद्योजक आणि शिवसेनेचे जिल्हा परिषद उमेदवार सुमित काते यांनी कोणताही विलंब न लावता आपल्या स्वखर्चातून या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला. यासाठी स्थानिक शेतकरी निखिल करंजे यांनी आपली जागा देऊन सहकार्य केले. या विकासकामामुळे प्रभावित होऊन ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

रविवार, १८ जानेवारी रोजी आयोजित या सोहळ्यात ऐनघर ग्रुप ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच रेश्मा तेलंगे, माजी सदस्य सुनील सुटे, विनोद निरगुडे, सामाजिक कार्यकर्ते राम तेलंगे, केशव तेलंगे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भगवा हाती धरला.
यावेळी व्यासपीठावर माजी सरपंच सचिन भोसले, जयेश जाधव, प्रकाश डोबले, विभाग संघटक दिनेश घाग, संजय कणघरे, कोकण पर्यटन मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मोरे, शहरप्रमुख संतोष चितळकर, विश्वनाथ शिर्के, संजय पिंपळे, मंदार कोतवाल यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व महिला आघाडी उपस्थित होत्या.
विरोधकांसमोर आव्हान
नागोठणे जिल्हा परिषद गटात सुमित काते यांच्यासाठी मनोज खांडेकर यांनी लावलेली फिल्डिंग आणि प्रत्यक्ष जमिनीवर उतरून केलेली विकासकामे विरोधकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. “केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष काम करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी जनता उभी राहत आहे,” अशी भावना यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली.
