• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रोहा तालुक्यातील भुवनेश्वर येथे घरफोडी करणारी टोळी मध्यप्रदेशातून जेरबंद

ByEditor

Aug 18, 2023

रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने तपास

अमूलकुमार जैन
अलिबाग :
रोहे शहरापासून नजीकच असणाऱ्या भुवनेश्वर येथील निवृत्त तहसीलदार मोहन साठे यांच्या घरी झालेल्या घरफोडीचा तपास मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने करीत सर्व मुद्देमाल जप्त करण्यात यश प्राप्त केले आहे.

रोहा नगरपालिका हद्दीतील भुवनेश्वर शिल्पनगरी येथे राहणारे निवृत्त तहसीलदार मोहन साठे यांच्या मालकीच्या असलेल्या बंद घरात 27 जुलै 2023 रोजी रात्रीच्या सुमारास घरफोडी झाल्याची खळबळजनक घटना घडली होती. घराच्या आजूबाजूला कोणी नसल्याचा फायदा उठवून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला होता. चोरी झालेल्या ऐवजात सोन्याचे दागिने, रोकड यांसह अन्य मौल्यवान वस्तूंचा समावेश होता. चोरीची घटना समजताच श्वान पथक, फिंगर प्रिंट पथक यंत्रणा शोधार्थ तातडीने दाखल झाली. पोलीस उपविभागीय अधिकारी सोनाली कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. मोहन साठे हे कामानिमित्त काही दिवस बाहेर गावी गेल्याने त्यांनी एका व्यक्तीवर घराची जबाबदारी दिली. मात्र ती व्यक्ती धाटाव एमआयडीसीतील कंपनीत रात्री कामावर गेल्याचे समजताच चोरीचा हा गंभीर प्रकार घडला होता. चोरट्यांनी दरवाजा शेजारील ग्रील उपटून काढून खिडकीद्वारे आत प्रवेश करून चोरी केल्याचे समोर आले. चोरट्यांनी आधी समोरील सीसीटीव्ही कॅमेरा वर केला, दुसरे अतिशय शिताफीने मोडतोड करून टाकले आणि खिडकीतून घरात प्रवेश केला असल्याचे घटनाक्रमातून दिसत होते.

सदर गुन्हा हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडील पोलीस हवालदार अमोल हंबीर, पोलीस शिपाई ईश्वर लांबोटे यांनी केलेल्या तांत्रिक अन्वेषणावरून सदर गुन्ह्यातील आरोपी मध्यप्रदेश येथील असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक नागेश कदम, पोलीस उप निरीक्षक धनाजी साठे, पोलीस हवालदार अमोल हंबीर, प्रतिक सावंत, जितेंद्र चव्हाण, राकेश म्हात्रे, पोलीस नाईक विशाल आवळे, सचिन वावेकर, पोलीस शिपाई ईश्वर लांबोटे, अक्षय सावंत असे पथक गठीत केले. सदर पथकाने मध्यप्रदेश येथील दुर्गम भागातील गेटा गांव, तांडा पोलीस ठाणे येथे जावून मध्यप्रदेश येथील गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार भैरवसिंग देवडा, सहाय्यक फौजदार रामसिंग गौरे, पोलीस शिपाई आर. बलराम, राखीव प्रशांत सिंग चौहान यांच्या मदतीने दुर्गम भागातील कैला कमरू डावर ( वय 26), निहाल सिंग गोवन सिंग डावर (वय 40), सोहब इंदरसिंग डावर (वय 36) सर्व रा. गेटा ता. कुक्षी जि. धार, राज्य मध्यप्रदेश यांना गुन्हयाचे कामी धैर्याने ताब्यात घेवून त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी रोहा येथे घरफोडी केलेल्या गुन्हयाची कबुली दिली.

सदर आरोपीत यांना स्थानिक गुन्हे शाखेकडे आणून त्यांना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरी झालेला एकुण माल 30.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि अर्धा किलो वजनाचे चांदीचे भांडे असा १०० टक्के मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उप निरीक्षक धनाजी साठे हे करीत आहेत. पोलीस अधीक्षक, सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखालील पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा बाळासाहेब खाडे यांचे अधिपत्याखाली सहायक पोलीस निरीक्षक नागेश कदम, पोलीस उप निरीक्षक धनाजी साठे, पोलीस हवालदार अमोल हंबीर, प्रतिक सावंत, जितेंद्र चव्हाण, राकेश म्हात्रे, पोलीस नाईक विशाल आवळे, सचिन वावेकर, पोलीस शिपाई ईश्वर लांबोटे, अक्षय सावंत, सायबर विभागाचे पोना तुषार घरत, पोशि अक्षय पाटील यांनी रोहा येथील घरफोडीतील आरोपींना मध्यप्रदेश येथील गेटा गांव, तांडा पोलीस ठाणे हद्दीतील दुर्गम भागातून ताब्यात घेवून चोरी केलेला सर्व 100 टक्के मुद्देमाल जप्त करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!