दांडा परिसरातील घटना; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, दोषींवर कठोर कारवाईची मागणी
श्रीवर्धन | अनिकेत मोहित
श्रीवर्धन तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून शांतता असतानाच, पुन्हा एकदा अघोरी विद्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. श्रीवर्धन येथील दांडा विभागातील स्मशानभूमीत काळी बाहुली, लिंबू, टाचण्या आणि एका महिलेचा फोटो असे जादूटोण्याचे साहित्य आढळून आल्याने परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

काय आहे नेमका प्रकार?
नेहमीप्रमाणे नागरिक स्मशानभूमी परिसरात गेले असता, त्यांना एका ठिकाणी संशयास्पद वस्तू मांडलेल्या दिसल्या. जवळ जाऊन पाहिल्यावर तिथे काळ्या कापडाची बाहुली, तिला टोचलेल्या टाचण्या, कापलेले लिंबू आणि एका महिलेचा फोटो दिसून आला. हा अघोरी प्रकार असल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. घटनास्थळी सापडलेल्या फोटोतील महिला स्थानिक नसल्याचे प्राथमिक दृष्ट्या समोर येत असून, हा प्रकार श्रीवर्धनबाहेरील व्यक्तींनी केला असावा, असा दाट संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
अशा प्रकारे कोणा अज्ञात महिलेचा फोटो वापरून स्मशानभूमीत अघोरी कृत्य केल्याने महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. अशा कृत्यांमुळे समाजात केवळ अंधश्रद्धाच पसरत नाही, तर समाजात भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होत असल्याचे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.
प्रशासनाकडे कडक कारवाईची मागणी
या घटनेमुळे श्रीवर्धनकर कमालीचे संतप्त झाले असून, दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर ‘जादूटोणा प्रतिबंधक कायद्या’नुसार कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने खालील पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. स्मशानभूमी परिसरात सीसीटीव्ही बसवणे, रात्रीची गस्त वाढवणे आणि अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत जनजागृती करण्याची गरज असल्याचेही नागरिकांनी नमूद केले आहे.
या गंभीर प्रकाराची दखल घेऊन पोलीस प्रशासन काय पावले उचलते, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
