ऐन निवडणुकीच्या तोंडावर भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन
माणगाव । सलीम शेख
रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असतानाच, माणगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे भगदाड पडले आहे. अडीच महिन्यांपूर्वी शिवसेनेत गेलेले माजी उपजिल्हाप्रमुख रमेश मोरे यांनी पुन्हा ‘स्वगृही’ परतण्याचा निर्णय घेतला असून, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष विजय (राजू) मोरे यांनीही शेकडो समर्थकांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. सोमवार, १९ जानेवारी २०२६ रोजी कुणबी भवन हॉल येथे पार पडलेल्या या सोहळ्यामुळे माणगावमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने आयोजित या मेळाव्यात राज्याचे मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते सर्व प्रवेशकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना मंत्री गोगावले म्हणाले की, “रमेश मोरे आणि विजय मोरे यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची ताकद द्विगुणीत झाली आहे. ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून शिवसेनेचे भगवे वादळ निर्माण करावे.” यावेळी त्यांनी पक्षहितासाठी माघार घेणाऱ्या ज्ञानदेव पवार आणि सुजित शिंदे यांचे विशेष कौतुक करत, शिवसेनेच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.
या सोहळ्यात रमेश मोरे यांची मोर्बा जिल्हा परिषद गटातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. “भरतशेठ गोगावले यांनी माझ्यावर विश्वास दाखवून पुन्हा स्वगृही स्थान दिले, त्याबद्दल मी ऋणी आहे. मोर्बा गटाच्या विकासासाठी आणि पक्षाच्या वाढीसाठी मी प्रामाणिकपणे काम करेन,” असे भावनिक उद्गार रमेश मोरे यांनी काढले.
यावेळी व्यासपीठावर तालुका प्रमुख ॲड. महेंद्र माणकर, शिवसेना नेते अनिल नवगणे, सुधीर पवार, युवासेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे, उपजिल्हाप्रमुख अविनाश नलावडे, म्हसळा सभापती राखी करंबे, रामभाऊ म्हसकर, सुजित शिंदे, राजाभाऊ रणपिसे, शरीफ हार्गे यांच्यासह अनेक पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे दोन मोठे स्तंभ ढासळल्याने तालुक्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे.
