आघाडी-युतीच्या समीकरणांमुळे इच्छुकांची गोची; पक्षनिष्ठा वाऱ्यावर, संधीसाधू राजकारणाला ऊत
उरण । घनःश्याम कडू
नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांच्या धामधुमीनंतर आता उरण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. मात्र, प्रत्यक्ष मतदानापूर्वीच तालुक्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून उमेदवारीवरून विविध पक्षांतर्गत नाराजीचे नाट्य उघडपणे समोर येऊ लागले आहे. युती आणि आघाडीच्या गणितांमुळे अनेक जुन्या निष्ठावंतांना डावलले जात असल्याने तालुक्यात राजीनाम्यांचे सत्र सुरू झाले असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
उमेदवारीसाठी कसरत, इच्छुकांचा संताप
उरण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या चार आणि पंचायत समितीच्या आठ जागांसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. युती आणि आघाडीच्या जागावाटपामुळे अनेक इच्छुकांची संधी हुकली आहे. ज्या पदाधिकाऱ्यांना यापूर्वी उमेदवारीचे शब्द देण्यात आले होते, त्यांची नावे अंतिम यादीत डावळली जात असल्याचे स्पष्ट होताच असंतोष उफाळून आला आहे. याचेच पडसाद म्हणून काही बड्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे व प्राथमिक सदस्यत्वाचे राजीनामे सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.
स्वार्थासाठी ‘निष्ठा’ वाऱ्यावर?
सध्याच्या बदलत्या राजकीय परिस्थितीत ‘स्वार्थ साध्य होईपर्यंत पक्षाची साथ आणि अडचण येताच पक्षबदल’ असे चित्र उरणमध्ये पाहायला मिळत आहे. काही इच्छुक उमेदवार तिकीट मिळवण्यासाठी दुसऱ्या पक्षाची दारे ठोठावत असल्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, काही ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अशा दोन्ही जागा एकाच कुटुंबात पदरात पाडून घेण्यासाठी पती-पत्नी किंवा नातेवाईक वेगवेगळ्या पक्षांतून नशीब आजमावण्याच्या तयारीत आहेत.
कार्यकर्त्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर
नेत्यांच्या या ‘संधीसाधू’ राजकारणामुळे वर्षानुवर्षे पक्षाचा झेंडा खांद्यावर घेणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. नेत्यांच्या पक्षांतरामुळे कार्यकर्त्यांचे राजकीय भवितव्य अंधारात जात असल्याची भावना व्यक्त होत आहे. यापूर्वीही अनेकांनी उमेदवारीसाठी पक्षबदल केला होता, मात्र तिथेही अपेक्षाभंग झाल्याने आता त्यांची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी झाली आहे.
उरण तालुक्यातील या राजकीय उलथापालथीमुळे पक्षनिष्ठा दुय्यम ठरली असली, तरी सुज्ञ मतदार या संधीसाधू राजकारण्यांना धडा शिकवणार का? की पुन्हा तेच चेहरे सत्तेत बसणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
