नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिहारचे ज्येष्ठ नेते आणि पाच वेळा आमदार राहिलेले नितीन नबीन यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. पक्षातील सर्व गटांचे एकमत झाल्याने ही निवड निर्विवाद ठरली असून, आज अधिकृतपणे याची घोषणा करण्यात आली. यावेळी विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. नितीन नबीन यांच्या निवडीमुळे भाजपला आता नवे आणि तरुण नेतृत्व लाभले असून, आगामी राजकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पक्ष अधिक सक्षम होईल, असा विश्वास पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केला आहे.
नितीन नबीन हे भाजपचे १२ वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारत आहेत. त्यांचा राजकीय प्रवास अत्यंत प्रभावी राहिला आहे. वडिलांच्या, म्हणजेच भाजपचे दिग्गज नेते नवीन किशोर सिन्हा यांच्या निधनानंतर वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी ते पाटणा पश्चिम मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. तेव्हापासून २०१० पासून आजपर्यंत ते बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून आले आहेत. सध्या ते बिहार सरकारमध्ये पथ निर्माण मंत्री म्हणून कार्यरत असून, पक्षात एक मजबूत संघटक म्हणून त्यांची ओळख आहे.
जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर भाजपने पुन्हा एकदा एका संघटनशील नेत्यावर विश्वास टाकला आहे. धक्कातंत्र आणि अनपेक्षित उमेदवारांना संधी देण्याची भाजपची परंपरा यावेळीही दिसून आली. राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती होण्यापूर्वी नबीन हे विधानसभा विजयाबद्दल कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात व्यस्त होते. “पक्ष कार्यकर्त्यांच्या कठोर परिश्रमातूनच अनेक नितीन नबीन तयार होतात, मी त्यांच्यासमोर नतमस्तक आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. नितीन नबीन यांच्या नेतृत्वाखाली भाजपची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल आणि आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
