नागोठणे: विशेष प्रतिनिधी
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजताच नागोठणे परिसरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. नेहमीप्रमाणे यंदाही सर्वच राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर ‘नागोठणे शहराला शुद्ध पाणी पुरवठा’ हा कळीचा मुद्दा अग्रक्रमाने दिसून येत आहे. मात्र, आत्तापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत मिळालेली आश्वासने आणि प्रत्यक्षातील कोरड यामुळे नागोठणेकर जनता आता “निवडणुका येतात आणि जातात, पण आमची तहान कधी भागणार?” असा संतप्त सवाल विचारत आहे.
आश्वासनांची पुनरावृत्ती
नागोठणे शहराचा विस्तार झपाट्याने होत असून लोकसंख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, या वाढत्या लोकसंख्येला ‘शुद्ध’ पाणीपुरवठा करण्यात स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना अद्याप यश आलेले नाही. दरवेळी निवडणुका आल्या की, सर्वच पक्षांचे उमेदवार मतदारांच्या दारात जाऊन “आम्हाला निवडून द्या, आम्ही शहराचा शुद्ध पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावू,” असे गाजर दाखवतात. दुर्दैवाने, निवडणूक संपली की हे आश्वासनही फाईलबंद होते, असा आजवरचा अनुभव आहे.
नागोठणेकरांची अवस्था ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’
शहराच्या जवळूनच अंबा नदी वाहते, येथील केटी बंधाऱ्यातून विविध औद्योगिक कारखान्यांसह अनेक गावांना पाणीपुरवठा होत आहे, मात्र नागोठणेकरांना मात्र दूषित पाण्याचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात तर नळाला येणाऱ्या गढूळ पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनतो.
सत्ताधारी नवीन योजना प्रगतीपथावर असल्याचे सांगत आहेत. तर विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांनी केवळ भ्रष्टाचार केला आणि शुद्ध पाण्याच्या नावाखाली जनतेची दिशाभूल केली, असा आरोप करत आहेत. मात्र, नागोठण्यातील जनता आता सुज्ञ झाली आहे.
थोडक्यात सांगायचे तर, नागोठण्याचे राजकारण पुन्हा एकदा शुद्ध पाण्याभोवती फिरू लागले आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीत पाण्याचे राजकारण कोणाला तारणार आणि कोणाला बुडवणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. मात्र, या सर्व गदारोळात नागोठणेकरांना खरोखरच शुद्ध पाणी मिळणार की पुन्हा त्यांच्या पदरी आश्वासनांचेच ‘थेंब’ पडणार, हा खरा प्रश्न आहे.
