महाड | मिलिंद माने
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाड तालुक्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. मंगळवारी शिवसेना शिंदे गटाने मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत वाजत-गाजत रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. आज जिल्हा परिषद गटासाठी ४, तर पंचायत समिती गणासाठी १४ उमेदवारी अर्ज प्रशासनाकडे दाखल करण्यात आले आहेत.
भगवे वादळ आणि शक्तीप्रदर्शन
गेल्या चार दिवसांपासून नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याच्या प्रक्रियेत शांतता होती. मात्र, आज शिवसेनेच्या शिंदे गटाने महाडमध्ये जंगी रॅली काढली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेल्या या रॅलीत मंत्री भरत मारुती गोगावले यांच्या पत्नी व माजी जि.प. सदस्या सुषमा गोगावले, तालुकाप्रमुख रवींद्र ऊर्फ बंधू तरडे आणि असंख्य शिवसैनिक सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि भगव्या फेट्यांच्या ललकारीत उमेदवारांनी प्रांत कार्यालयात जाऊन आपले अर्ज सादर केले.
अर्जांची आकडेवारी आणि विभागवार स्थिती
तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गट आणि १० पंचायत समिती गणांसाठी ही निवडणूक होत आहे. आज दाखल झालेल्या अर्जांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
जिल्हा परिषद गट (एकूण ४ अर्ज):
- बिरवाडी विभाग: १
- खरवली विभाग: १
- नडगाव तर्फे बिरवाडी: १
- करंजाडी विभाग: १
(दासगाव विभागातून आज एकही अर्ज आलेला नाही.)
पंचायत समिती गण (एकूण १४ अर्ज):
- धामणे: २
- बिरवाडी: ३
- वरंध: ३
- खरवली: २
- नडगाव तर्फे बिरवाडी: २
- नाते: १
- अप्पर तुडील: १
दासगाव विभागात अद्याप निरंक
विशेष म्हणजे, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अशा दोन्ही स्तरांवर दासगाव विभागातून अद्याप एकाही पक्षाच्या उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. १६ जानेवारीपासून सुरू झालेली ही प्रक्रिया २१ जानेवारीपर्यंत चालणार आहे. उर्वरित दिवसांत इतर राजकीय पक्ष आपले उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याने चुरस वाढण्याची शक्यता आहे.
