श्रीवर्धन । अनिकेत मोहित
श्रीवर्धन तालुक्यातील गडबवाडी गाव परिसरात सुरू असलेल्या बॉक्साइट उत्खनन प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. निसर्गाची मोठ्या प्रमाणावर हानी होत असून संबंधित उत्खननास दिलेल्या परवानग्यांची सखोल शहानिशा करण्यात यावी, अशी ठाम मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सध्या सुरू असलेल्या उत्खननामुळे आसपासच्या गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर होत चालली आहे. भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घट होत असून विहिरी व बोअरवेल आटण्याच्या मार्गावर आहेत. यासोबतच, उत्खननातून उडणाऱ्या प्रचंड धुळीमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांमध्ये श्वसनाचे आजार वाढत असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत.
विशेष चिंतेची बाब म्हणजे, चालू असलेले बॉक्साइट उत्खनन क्षेत्र थेट वनखात्याच्या जमिनीला लागून आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे वनखात्याने तातडीने आपली जमीन पुन्हा मोजून अधिकृत हद्द निश्चित करावी, जेणेकरून वनक्षेत्रावर अतिक्रमण होणार नाही आणि वन्यजीवांना त्रास होणार नाही, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, पर्यावरणीय परिणामांचा सविस्तर अहवाल, पाणी स्रोतांवर होणारा परिणाम, तसेच प्रदूषण नियंत्रणाचे नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत की नाही, याची प्रशासनाने तातडीने चौकशी करावी. अन्यथा, भविष्यात या उत्खननामुळे संपूर्ण परिसराला मोठ्या पर्यावरणीय व आरोग्यविषयक संकटाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
ग्रामस्थांच्या या आंदोलनामुळे आता प्रशासन व संबंधित विभाग कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
