माणगाव । सलीम शेख
सर्वत्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची धामधूम सुरू आहे. दि. २१ जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत. दि. २० जानेवारी रोजी ४८ गोरेगाव जिल्हा परिषद गणातून पत्रकार भारत विष्णु गोरेगावकर यांनी सपत्नीक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
यावेळी गोरेगाव सरपंच जुबेर अब्बासी, ज्येष्ठ नेते दिलीप शेठ, भूपेंद्र शेठ, उपसरपंच चंद्रकांत गोरेगावकर, सदस्य विनोद बागडे, दिनेश गोरीवले आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकार भारत गोरेगावकर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, मा. आ. अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव जिल्हा परिषद गणातून उमेदवारी दिली असून मी पहिल्यांदाच जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जो माझ्यावर विश्वास दाखविला आहे. प्रामाणिकपणे मेहनत करून पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थकी लावण्याचा नक्की प्रयत्न करेन.
भारत गोरेगावकर हे गेली अनेक वर्ष पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. संपूर्ण जिल्ह्यात त्यांचा नावलौकिक आहे. त्यांच्या माध्यमातून गोरेगाव विभागातील अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गोरेगाव विभागात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. भारत गोरेगावकर यांनी अनेक प्रश्नांवर आवाज उठवून ते शासन दरबारी मांडून मार्गी लावले आहेत. खा. सुनील तटकरे यांचे खंदे समर्थक म्हणून सुद्धा त्यांची एक वेगळी ओळख आहे.
