आचारसंहितेचे कारण देत दुरुस्ती लांबणीवर; ‘रस्ता नाही, तर मत नाही’चा पवित्रा
धाटाव | शशिकांत मोरे
रोहा तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तांबडी–बारशेत रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. संपूर्ण रस्ता खड्डे व दगडांच्या साम्राज्यात हरवला असून, डांबराचा साधा थरही शिल्लक राहिलेला नाही. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजलेले असतानाच, सुमारे ३ हजार मतदारांना या जीवघेण्या प्रवासाचा सामना करावा लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दहा किलोमीटरचा मार्ग, अनेक गावांची कोंडी
तांबडी ते बारशेत या १० किलोमीटरच्या अंतरात खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. या रस्त्याचा वापर प्रामुख्याने तांबडी बुद्रुक, निवी ठाकरवाडी, सवाने बारशेत गौळवाडी, म्हासाडी, वाली, कारिवणे गावांतील नागरिक करतात.

रोहा बाजारपेठ, शासकीय कार्यालये आणि दवाखान्यासाठी हाच मुख्य मार्ग असल्याने शाळकरी विद्यार्थी, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. “नेते फक्त निवडणुकीपुरते मते मागायला येतात, पण रस्ता पाहायला कोणाकडे वेळ नाही,” अशी संतप्त भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचे संकेत
भुनेश्वर जिल्हा परिषद आणि धाटाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या या पट्ट्यात सुमारे २५०० ते ३००० मतदार आहेत. निवडणुकांच्या तोंडावर साधी मलमपट्टीही न झाल्याने, ‘रस्ता नसेल तर मत नाही’ अशी भूमिका येथील मतदार राजा घेण्याच्या तयारीत आहे. याचा थेट फटका कोणत्या राजकीय पक्षाला बसणार, याची चर्चा आता रंगू लागली आहे.
“या रस्त्याच्या कामाचे टेंडर पास झाले आहे. मात्र, सध्या निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने प्रत्यक्ष काम सुरू करता येत नाही. आचारसंहितेत थोडी शिथिलता मिळताच ४ किलोमीटरच्या रस्त्याचे काम तातडीने सुरू केले जाईल.”
-विजय बागुल,
उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, रोहा.
