जिल्ह्यातील पहिलीच पतसंस्था; १० महिन्यांत २५० कोटींची विक्रमी भर
अलिबाग । सचिन पावशे
रायगड जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात अलिबागच्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. संस्थेने १००३ कोटी रुपयांच्या एकत्रित व्यवसायाचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला असून, असा पल्ला गाठणारी ही रायगड जिल्ह्यातील पहिलीच पतसंस्था ठरली आहे. संस्थेचे संस्थापक सुरेश पाटील व अध्यक्ष अभिजित पाटील यांनी बुधवारी (दि. २१) आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
लक्ष्य वेळेपूर्वीच पूर्ण
आदर्श पतसंस्थेची स्थापना १९९८ मध्ये झाली. अवघ्या २७ वर्षांच्या प्रवासात संस्थेने बँकिंग क्षेत्रात अर्बन बँकांच्या तोडीचे काम उभे केले आहे. मार्च २०२६ पर्यंत १००० कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, मात्र सभासदांच्या अतूट विश्वासामुळे हे लक्ष्य दहा महिने आधीच पूर्ण झाले आहे. गेल्या दहा महिन्यांत संस्थेने २५० कोटी रुपयांच्या व्यवसायाची मोठी भर घातली आहे.
आकडेवारी एका नजरेत:
| एकत्रित व्यवसाय: १०००३ कोटी+ |
| एकूण ठेवी: ५५८ कोटी रुपये |
| कर्ज वाटप: ४४५ कोटी रुपये |
| ग्रॉस एनपीए (NPA): १ टक्क्यापेक्षा कमी |
| एकूण शाखा: २२ (१ स्वतंत्र गोल्ड शाखेंसह) |
राज्यात अग्रगण्य ठरण्याचे ध्येय
संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र असून सध्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पुणे आणि मुंबई या जिल्ह्यांत विस्तार आहे. पुण्यातील एका पतसंस्थेचे विलीनीकरण करून तेथे दोन शाखा यशस्वीपणे चालवल्या जात आहेत. विशेष म्हणजे, संस्थेच्या सर्व २२ शाखा सध्या नफ्यात आहेत. “भविष्यात राज्यातील पहिल्या पाच पतसंस्थांमध्ये ‘आदर्श’ला नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे,” असे संस्थापक सुरेश पाटील यांनी यावेळी नमूद केले.
आर्थिक शिस्त आणि विश्वासार्हता
अध्यक्ष अभिजित पाटील यांनी संस्थेच्या यशाचे श्रेय कर्मचारी आणि पारदर्शक कारभाराला दिले. ते म्हणाले, “कर्ज वसुलीमध्ये कोणतीही तडजोड न केल्यामुळे आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःला झोकून देऊन काम केल्यामुळेच ही प्रगती शक्य झाली. सध्या सहकार क्षेत्रात अविश्वासाचे वातावरण असताना आदर्श पतसंस्थेवरील ग्राहकांचा विश्वास वाढत आहे. आमची संस्था वित्तीयदृष्ट्या सुदृढ (FSWM) असून, ३१ मार्च २०२६ पर्यंत एनपीए ० टक्क्यावर आणण्याचा आमचा प्रयत्न राहील.”
