जि. प. साठी २५, तर पंचायत समितीसाठी ४९ उमेदवारांचे अर्ज; ‘आयात’ उमेदवारांमुळे कार्यकर्त्यांत नाराजी
उरण । अनंत नारंगीकर
उरण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, राजकीय वातावरण कमालीचे तापू लागले आहे. जिल्हा परिषदेच्या ४ जागांसाठी २५, तर पंचायत समितीच्या ८ जागांसाठी ४९ उमेदवारांनी आपले नशीब आजमावण्यासाठी मैदानात उडी घेतली आहे. अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार असली तरी, मनसे आणि शिवसेना (शिंदे गट) यांनीही उमेदवार उभे केल्याने निवडणुका रंगतदार होणार आहेत.

प्रमुख मतदारसंघांतील हायव्होल्टेज लढती:
| मतदारसंघ/गण | भाजप उमेदवार | महाविकास आघाडी (मविआ) उमेदवार |
| जासई जि.प. | जे. डी. जोशी | डॉ. मनिष पाटील (मविआ) |
| जासई पं.स. | मनिषा बळीराम घरत | निर्मला नरेश घरत (शेकाप) |
| विंधणे पं.स. | जोत्सना अजित पाटील | प्रियांका दिपक मढवी (शेकाप) |
| चिरनेर जि.प. | देवेंद्र पाटील | अविनाश ठाकूर (काँग्रेस) |
| चिरनेर पं.स. | साक्षी सूरज पाटील | कविता रुपेश पाटील (शिवसेना उबाठा) |
| नवघर जि.प. | मंदा उर्फ प्रभावती भोईर | प्रेरणा कुणाल पाटील (शिवसेना उबाठा) |
| चाणजे जि.प. | रिना जितेंद्र घरत | सिद्धी सागर कडू (शिवसेना उबाठा) |
| आवरे पं.स. | समिधा निलेश पाटील | अविनाश गावंड (शेकाप) |
याव्यतिरिक्त भेंडखलमध्ये मिलिंद ठाकूर (भाजप) विरुद्ध दिपक भोईर (शिवसेना उबाठा) आणि नागावमध्ये राजू ठाकूर (भाजप) विरुद्ध महेश म्हात्रे (शेकाप) यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे.
बंडखोरी आणि बहुकोणीय लढतीचे सावट
उरण पंचायत समितीच्या ८ जागांसाठी मुख्यत्वे भाजप विरुद्ध मविआ असा सामना असला तरी, मनसे, शिवसेना (शिंदे गट), कम्युनिस्ट पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीनेही आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी बहुरंगी लढती होऊन मतांचे विभाजन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
उमेदवार ‘आयात’ केल्याने कार्यकर्त्यांत नाराजी
यावेळच्या निवडणुकीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे राजकीय पक्षांना विजयाचे समीकरण जुळवण्यासाठी दुसऱ्या पक्षांतून उमेदवार ‘आयात’ करावे लागले आहेत. निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी डावलल्याने अनेक गटांत नाराजीचा सूर असून, कार्यकर्त्यांमधील या उदासीनतेचा फटका प्रचाराला बसण्याची शक्यता आहे.
शक्तिप्रदर्शनाने दणाणले उरण
अर्ज दाखल करताना सर्वच पक्षांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी माजी आमदार मनोहर शेठ भोईर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, नगराध्यक्षा भावना ताई घाणेकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत घरत, मनसे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, शिवसेना उबाठाचे उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, शेकाप चिटणीस रवी पाटील, शिवसेना शिंदे गटाचे रमेश म्हात्रे यांसह अनेक आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आता अर्जांची छाननी आणि माघारीनंतर प्रचाराचा खरा धुरळा उडणार असून उरणचा गड कोण राखणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
