अंतिम दिवशी उमेदवारांची मांदियाळी; दोन्ही ‘शिवसेना’ आणि राष्ट्रवादीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन
महाड । मिलिंद माने
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी महाडमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ५ गटांसाठी २५ आणि पंचायत समितीच्या १० गणांसाठी ४३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. बुधवारी शेवटचा दिवस असल्याने महाड प्रांत कार्यालयासमोर समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
राजकीय शक्तीप्रदर्शन आणि चढाओढ
निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मंगळवारी शिवसेना (शिंदे गट) कडून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केल्यानंतर, बुधवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने शहरात प्रचंड शक्तीप्रदर्शन केले. यावेळी माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले. विशेषतः विन्हेरे विभागातून सोमनाथ ओझर्डे आणि शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश केलेल्या सुषमा चंद्रकांत मोरे यांनी समर्थकांच्या अलोट गर्दीसह अर्ज दाखल करून निवडणुकीत रंगत आणली आहे.
विभागांनुसार अर्जांची आकडेवारी:
१. जिल्हा परिषद गट (एकूण २५ अर्ज):
बिरवाडी: ०४ अर्ज
खरवली: ०४ अर्ज
नडगाव तर्फे बिरवाडी: ०६ अर्ज
दासगाव: ०३ अर्ज
करंजाडी: ०८ अर्ज
२. पंचायत समिती गण (एकूण ४३ अर्ज): धामणे (०३), बिरवाडी (०३), वरंध (०७), खरवली (०४), नडगाव तर्फे बिरवाडी (०४), नाते (०५), दासगाव (०३), अप्परतुडील (०४), करंजाडी (०५) आणि विन्हेरे (०५).
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जागांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर ७ फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुरळा उडणार असून, महाडचा गड कोण राखणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
