• Mon. Jan 26th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नागोठणे मोहल्यातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश; सुमित काते यांचे पारडे जड

ByEditor

Jan 24, 2026

नागोठणे । किरण लाड
नागोठणे विभागातील राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली असून, मोहल्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख मनोज खांडेकर आणि जिल्हा परिषद उमेदवार सुमित काते यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या सततच्या ‘इनकमिंग’मुळे ३९-नागोठणे जिल्हा परिषद गटात शिवसेनेची ताकद वाढली असून, सुमित काते यांचे पारडे जड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

नागोठणे मोहल्यातील सामाजिक कार्यकर्ते शोएब सय्यद, मुस्ताक सैय्यद, तुफील कडवेकर आणि शोएब कडवेकर यांनी सुमित काते यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला. या प्रवेशामुळे मुस्लिम बहुल भागात शिवसेनेला मोठी रसद मिळण्याची शक्यता आहे.

यावेळी शिवसेनेचे विभाग संघटक दिनेश घाग, वजरोली शाखाप्रमुख शैलेश कासार, सामाजिक कार्यकर्ते बाळाराम पोटे, धडाडीचे कार्यकर्ते संतोष (बाबू) घाग, फैय्याज सय्यद यांसह पक्षाचे अन्य प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सध्या नागोठणे आणि ऐनघर गणातील पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून २७ जानेवारीला चित्र स्पष्ट होईल. मात्र, ज्या पद्धतीने विविध मोहल्ल्यांमधील आणि गावांमधील कार्यकर्ते शिवसेनेत सामील होत आहेत, ते पाहता या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता मतदारांकडून वर्तवली जात आहे.

या वाढत्या समर्थनामुळे सुमित काते यांच्यासह मित्रपक्षांच्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला असून, विरोधकांसमोर मात्र मोठे आव्हान उभे राहिले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!