उरण : अनंत नारंगीकर
उरण शहर, ग्रामीण भाग आणि ओएनजीसीसह विविध प्रकल्पांची तहान भागवणारी एमआयडीसीची रानसई धरणातील मुख्य जलवाहिनी फुटल्याने संपूर्ण तालुक्यात पाणीबाणी निर्माण झाली आहे. चिर्ले रस्त्याजवळ जमिनीखाली तब्बल १५ फूट खोल ही वाहिनी फुटल्याने दुरुस्ती कामात मोठे अडथळे निर्माण झाले होते. अखेर दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर शनिवारी हे काम पूर्ण झाले असून लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.
हजारो लिटर पाणी वाया मिळालेल्या माहितीनुसार, रानसई धरणातून पाणीपुरवठा करणारी ९०० मिलीमीटर व्यासाची ही मुख्य जलवाहिनी गुरुवारी (दि. २२) सायंकाळच्या सुमारास अचानक फुटली. वाहिनी जुनी आणि जीर्ण झाल्याने ही गळती लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जलवाहिनी फुटल्यानंतर सुरुवातीच्या दोन तासांतच हजारो लिटर पाणी वाया गेले, ज्यामुळे परिसरातील रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहताना दिसत होते.
१५ फूट खोल खड्ड्यात दुरुस्तीचे आव्हान दिघोडे-चिर्ले रस्त्याखाली ही जलवाहिनी सुमारे १५ फूट खोल असल्याने एमआयडीसीच्या कर्मचाऱ्यांसमोर दुरुस्तीचे मोठे आव्हान होते. मातीचा ढिगारा आणि पाण्याचा उपसा करत कामगारांना गळतीपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेले हे काम शनिवारी (दि. २४) दुपारी पूर्णत्वास आले.
पाणीपुरवठा कधी होणार सुरळीत? या बिघाडामुळे उरण शहर, करंजा आणि नजीकच्या ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा गेल्या दोन दिवसांपासून पूर्णपणे ठप्प होता. यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. याबाबत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून जलवाहिनीमध्ये पाण्याचा दाब (Pressure) संथ गतीने सोडला जाईल. शनिवारी उशिरापर्यंत किंवा रविवारी सकाळपर्यंत सर्व भागात पाणी पोहोचेल.”
