महाड । मिलिंद माने
महाड नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानादिवशी झालेल्या राडा आणि मारहाण प्रकरणातील फरार असलेले उर्वरित पाच आरोपी अखेर शनिवारी महाड शहर पोलिसांत हजर झाले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुशांत जाबरे यांचाही समावेश आहे. याआधी शुक्रवारी दोन्ही गटांतील १३ जण शरण आले होते, त्यानंतर आता सर्व मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत.
न्यायालयाच्या ताशेऱ्यांनंतर हालचालींना वेग
नगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत शिंदे गटाचे विकास गोगावले आणि राष्ट्रवादीचे सुशांत जाबरे यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. याप्रकरणी दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल झाले होते, मात्र अटकेच्या भीतीने अनेक आरोपी फरार झाले होते. या प्रकरणाची दखल घेत न्यायालयाने ओढलेल्या कठोर ताशेऱ्यांनंतर आरोपींच्या अडचणी वाढल्या होत्या. परिणामी, शुक्रवारी विकास गोगावले आणि हनुमंत जगताप यांच्यासह १३ जणांनी शरणागती पत्करली होती, ज्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटातील पाच जण स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले. यामध्ये सुशांत गणेश जाबरे (तक्रारदार व आरोपी), अमित नामदेव शिगवण, व्यंकट बाब्बना मंडला, मोनिष मिंटू पाल व समीर मधुकर रेवाळे यांचा समावेश आहे.
या पाचही जणांना पोलिसांनी अधिकृतपणे अटक केली असून, त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना लवकरच न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. निवडणुकीच्या काळात झालेल्या या हिंसक प्रकरणामुळे महाडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. आता सर्व प्रमुख आरोपी गजाआड झाल्याने पोलीस तपासाला गती मिळणार आहे.
