म्हसळा (वार्ताहर) : म्हसळा तालुक्यातील ढोरजे कुडतुडी रस्ता सध्या दुरवस्थेमुळे आणि वनविभागाच्या जागेतीव वाढलेल्या झाडांमुळे प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना एसटी बस आणि खाजगी वाहनांना मोठ्या कष्टाचा सामना करावा लागत आहे.
हा रस्ता वनविभागाच्या आणि काही प्रमाणात खाजगी जमिनीतून जातो. सध्या रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या फांद्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आल्या आहेत. यामुळे सकाळी आणि संध्याकाळी धावणाऱ्या एसटी बसला (S.T.) या फांद्यांचा अडथळा होत आहे. खाजगी वाहनांचेही या फांद्यांमुळे नुकसान होत असून चालकांना वाहन चालवणे कठीण झाले आहे.
रस्त्याची अवस्था देखील अत्यंत दयनीय झाली असून ‘दमछाक’ करणारा प्रवास अशी या मार्गाची ओळख होऊ लागली आहे.
राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित सेवानिवृत्त सीमाशुल्क अधिकारी विजय शंकर चाळके यांनी या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. कुडतुडी ते कुडतुडी गौळवाडी या दरम्यानच्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी आणि वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
रस्त्याची ही दुरवस्था कायम राहिल्यास भविष्यात अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
