• Mon. Jan 26th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग; बोरी परिसरातील घटना, सुदैवाने जीवितहानी टळली

ByEditor

Jan 26, 2026

उरण | अनंत नारंगीकर
उरण शहरातील बोरी परिसरातील एका भंगाराच्या गोदामाला सोमवारी पहाटे २:३० च्या सुमारास भीषण आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते; मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली आहे. अद्याप आगीचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.

सोमवारी पहाटेच्या शांततेत बोरी येथील भंगार गोदामातून अचानक आगीच्या ज्वाळा बाहेर पडू लागल्या. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून तातडीने उरण पोलिसांना याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ ओएनजीसी (ONGC) आणि सिडको (CIDCO) च्या अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत गोदामातील साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी, कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अनधिकृत भंगार साठ्याचा प्रश्न ऐरणीवर

उरण शहरात सध्या २६ हून अधिक भंगाराची दुकाने असून, बोरी-पाखाडी परिसरातील शासकीय जागांवर या दुकानांचा विळखा पडला आहे. दलदलीच्या किंवा मोकळ्या जागांवर परप्रांतीयांनी अनधिकृतपणे थाटलेली ही दुकाने आता चिंतेचा विषय ठरत आहेत. यापूर्वी २७ ऑक्टोबर २०२३ रोजी रमझान खान यांच्या अशाच एका अनधिकृत गोदामाला आग लागली होती, ज्यात शेजारील परेश तेरडे यांच्या घराचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यावेळी उरणचे आमदार महेश बालदी यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न केले होते.

उरणचे ‘भोपाळ‘ होण्याची भीती

वारंवार घडणाऱ्या या आगीच्या घटनांमुळे उरणकरांमध्ये संतापाचे आणि भीतीचे वातावरण आहे. अनधिकृत भंगार गोदामांवर प्रशासनाचा वचक नसल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडून ‘उरणचे भोपाळ’ होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने या बेकायदेशीर गोदामांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!