ऐनघर पंचक्रोशीत सुमित काते यांचे पारडे जड; युतीला राजकीय धक्का
नागोठणे । महेंद्र म्हात्रे
रायगड जिल्ह्यातील नागोठणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. याचाच परिणाम म्हणून ऐनघर भागातील भाजप व राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी, महिलांनी आज शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. या मोठ्या पक्षांतरामुळे शिवसेनेचे उमेदवार सुमित काते यांचे निवडणुकीतील पारडे जड झाले आहे.

शिवसेना रोहा उप तालुका प्रमुख मनोज खांडेकर आणि जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार सुमित काते यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून ऐनघर पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांनी भगवा हाती धरला. भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मोठी अस्वस्थता होती, ज्याचा फायदा आता शिवसेनेला मिळताना दिसत आहे.

ऐनघर भागातील विविध वाड्यांमधून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये सुकेळी वाडीतील भगवान जाधव यांच्या नेतृत्वाखाली वसंत पवार, बारकू वाघमारे, दयाराम भोय, राजा हिलम, किरण हिलम, सुरज कापरे, कल्पेश जाधव, कुणाल पवार, सिद्धेश कातकरी, मनोज वाघमारे, चंद्रकांत भोय, चेतन वाघमारे, कार्तिक वाघमारे, महेश वाघमारे, मनोज घोगरकर, संदीप घोगरकर, बाळाराम पवार, वाघरण वाडीतील उत्तम शिद यांच्या नेतृत्वाखाली शिवराम हिरवे, नित्तम शिद, अनिल पुंजारे, रमेश पुंजारे, ताया मेंगाळ, हेमा वाघ, सोनु शिद, तानाजी पुंजारे तर खैरवाडीतील विजय हंबीर (भुऱ्या) यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठल उघडा, ताया हंबीर, अनिल हंबीर, सौरभ हंबीर, हरेश हंबीर, किसन हंबीर, प्रभाकर उघडा, दामोदर उघडा यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
निवडणुकीत अटीतटीची लढत
नागोठणे परिसरात सध्या शिवसेना व मित्र पक्षाने प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. जागोजागी होणारे पक्षप्रवेश आणि जनसंपर्क यामुळे विरोधकांच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. भाजप-राष्ट्रवादीच्या युतीला शह देण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली असून, ऐनघरमधील या पक्षप्रवेशामुळे सुमित काते यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
