ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याची कवचकुंडले!
अलिबाग (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक आरोग्यसेवा सहज आणि विनाशुल्क उपलब्ध व्हावी, या उदात्त हेतूने अलिबाग तालुक्यातील वावे येथील शिवदत्त मंदिर परिसरात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ‘उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था’ आणि ‘माणुसकी प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराला ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला.

दिनांक २५ जानेवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत पार पडलेल्या या शिबिरात गावातील महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि मुलांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. यामध्ये प्रामुख्याने सर्वसाधारण आरोग्य तपासणी, रक्तदाब (बीपी) व मधुमेह (शुगर) चाचणी, वजन व उंची मोजमाप, मोफत प्राथमिक औषधोपचार करण्यात आले. तपासणी दरम्यान ज्या रुग्णांना गंभीर आजाराची लक्षणे आढळली, त्यांना पुढील उपचारांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोलाचे मार्गदर्शनही करण्यात आले.

तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग
उज्ज्वल होम नर्सिंग सेवा दवाखाना (पिंपळभाट) येथील अनुभवी वैद्यकीय पथकाने या शिबिरात आपली सेवा दिली. यामध्ये डॉ. नितीन गांधी, डॉ. राहुल शर्मा, डॉ. मंजिरी पाटील यांच्यासह आरोग्य सेविका रुचिता कदम व कर्मचारी अंकुश चंदनशिव यांचा समावेश होता.
या उपक्रमासाठी ‘जय गिरनारी शिवदत्त मंदिर ट्रस्ट’चे अध्यक्ष श्री. प्रमोद केणे यांची विशेष उपस्थिती लाभली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष श्री. प्रमोद केणे यांच्या हस्ते उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
“समाजहितासाठी आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक विकास या क्षेत्रांत आमची संस्था सदैव तत्पर आहे. भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम विविध गावांमध्ये राबवण्याचा आमचा मानस आहे.”
— श्रीम. उज्ज्वला चंदनशिव
(अध्यक्षा, उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था)
या शिबिरासाठी डॉ. राजाराम हुलवान आणि डॉ. नितीन गांधी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. गावातच मोफत आरोग्य सुविधा मिळाल्याने वावे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
