बाळासाहेबांच्या प्रेरणेतून नागोठणे विभागाचा सर्वांगीण विकास करणार : सुमित काते
नागोठणे । किरण लाड
शिवसेना पक्षाचे संस्थापक, प्रखर हिंदुत्वाचे पुरस्कर्ते, ज्येष्ठ व्यंगचित्रकार आणि मराठी मनाचे सम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची १०० वी जयंती नागोठणे येथे अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. नागोठणे शिवसेना शाखेत आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आणि शिवसैनिकांनी उपस्थित राहून बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केले.
२३ जानेवारी या बाळासाहेबांच्या जन्मदिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर नागोठणे शिवसेना शाखेतही विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रोहा उप तालुकाप्रमुख मनोज खांडेकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा महिला उप संघटिका दर्शना जवके, नागोठणे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सुमित काते यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
याप्रसंगी वांगणी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच लहू तेलंगे, महिला विभाग प्रमुख वर्षा सहस्रबुद्धे, उप तालुकाप्रमुख गणपत म्हात्रे, विभागप्रमुख प्रविण ताडकर, संघटक दिनेश घाग, संतोष चितळकर, बाळू रटाटे, बळीराम बडे, प्रकाश मोरे, मुकेश भोय, राजेश सुर्वे, आकाश मढवी, हिराजी दुर्गावले, ग्रामपंचायत सदस्य ज्योती राऊत, इम्रान पानसरे, अंजली दुर्गावले, संदीप राऊत, विजय धामणे, संदीप वाजे, संजय पाटील, दिनेश वादळ, रुपेश पोटे, नागेश सुर्वे, अजित दळवी, संतोष घोसाळकर, फय्याझ सय्यद, अशफाक पानसरे, विहार हेंडे, महादेव दळवी यांसह शिवसेना (शिंदे गट) व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, महिला आघाडी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“बाळासाहेब हे अखंड हिंदुस्थानचे आणि आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांचे आराध्य दैवत आहेत. त्यांची प्रभावी वाणी, अचाट बुद्धिमत्ता आणि ठाम विचारसरणी हीच आमची खरी प्रेरणा आहे. साहेबांनी कधीही जातीभेद पाळला नाही; महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक जण ‘मराठी’ हीच त्यांची भूमिका होती. ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ हा मंत्र डोळ्यासमोर ठेवून नागोठणे विभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
— सुमित काते
(उमेदवार, नागोठणे जिल्हा परिषद गट)
