श्रीवर्धन | अनिकेत मोहित
श्रीवर्धन तालुक्यातील बोडणी घाट परिसरात आज पहाटे नऊच्या सुमारास भारतगॅस कंपनीचा सिलेंडरने भरलेल्या एका ट्रकचा भीषण अपघात झाला. सुदैवाने या घटनेत मोठी दुर्घटना टळली असून ट्रक चालक थोडक्यात बचावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सदर ट्रक घाट उतरत असताना अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला. अपघाताच्या वेळी चालक ट्रकमध्येच अडकला होता. मात्र प्रसंगावधान राखत त्याने वाट काढून स्वतःला ट्रकच्या बाहेर काढले.
या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून त्याला मुका मार लागल्याचे समजते. सुदैवाने ट्रकमधील सिलेंडरला कोणतीही गळती किंवा स्फोट झाला नाही, त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
घटनेची माहिती मिळताच श्रीवर्धन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. पुढील तपास सुरू असून घाट मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
या घटनेमुळे बोडणी घाटातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अवजड वाहनांची नियमित तपासणी व घाटात आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
