• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

​ऑल इंडिया फिन स्विमिंग फेडरेशन कप: पेणच्या जलतरणपटूंची राष्ट्रीय स्तरावर ‘फिन’शारी!

ByEditor

Jan 27, 2026

​पुणे (बालेवाडी): पुणे येथील बालेवाडी जलतरण संकुलात नुकत्याच पार पडलेल्या ‘ऑल इंडिया फिन स्विमिंग फेडरेशन कप २०२५–२६’ या राष्ट्रीय स्पर्धेत पेणच्या जलतरणपटूंनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत पदकांची लयलूट केली. २३ ते २६ जानेवारी २०२६ या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत पेणच्या खेळाडूंनी आपल्या कौशल्याच्या जोरावर निर्विवाद वर्चस्व गाजवले.

​सचिन शिंगरूत यांची सुवर्णभरारी

​या स्पर्धेत प्रशिक्षक सचिन शिंगरूत यांनी स्वतः उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करत ‘लीड बाय एक्झाम्पल’चा प्रत्यय दिला. त्यांनी विविध प्रकारांत एकूण तीन पदके पटकावली:
​१०० मीटर बायफिन्स: प्रथम क्रमांक (सुवर्णपदक)
​२०० मीटर बायफिन्स: प्रथम क्रमांक (सुवर्णपदक)
​५० मीटर बायफिन्स: तृतीय क्रमांक (कांस्यपदक)

​हर्षित पाटीलचे रौप्ययश

​युवा जलतरणपटू हर्षित पराग पाटील याने १०० मीटर सर्फेस मोनोफिन्स प्रकारात आपल्या वेगवान हालचालींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि द्वितीय क्रमांक (रौप्यपदक) पटकावत पेणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

​इतर खेळाडूंची लक्षवेधी कामगिरी

​पदकांसोबतच पेणच्या इतर खेळाडूंनीही राष्ट्रीय स्तरावरील पहिल्या पाच-सहा क्रमांकांत स्थान मिळवून आपली छाप पाडली:

​आरवी तुषार पाटील: ५० मीटर बायफिन्समध्ये चौथा, तर २०० मीटर बायफिन्समध्ये पाचवा क्रमांक.
​अर्णव पाटील: १०० मीटर सर्फेस मोनोफिन्समध्ये चौथा, तर ५० मीटर बायफिन्स व ५० मीटर सर्फेस मोनोफिन्समध्ये सहावा क्रमांक.
​हर्ष अनिल म्हात्रे: ४०० मीटर बायफिन्समध्ये चौथा, तर २०० मीटर बायफिन्समध्ये पाचवा क्रमांक मिळवून संघाच्या यशात भर घातली.

​प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि पेणचा नावलौकिक

​या सर्व खेळाडूंनी पेण (रायगड) येथील ‘मामा वास्कर जलतरण तलाव’ आणि ‘Aqua Life Swimming Club’ येथे कठोर सराव केला आहे. या यशात मुख्य मार्गदर्शक कोच रवींद्र म्हात्रे सर आणि सचिन शिंगरुत सर यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.

​या दैदीप्यमान यशामुळे Aqua Life Swimming Club सह संपूर्ण पेण तालुक्याचे आणि रायगड जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे. सर्व स्तरातून या खेळाडूंचे, प्रशिक्षकांचे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या पालकांचे अभिनंदन होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!