श्रीमद् भागवत कथा हा भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचा त्रिवेणी संगम: सुमित काते
नागोठणे । किरण लाड
श्रीमद् भागवत कथा हा केवळ कृष्णलीलांचा संग्रह नसून तो भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचा पवित्र त्रिवेणी संगम आहे. या कथेच्या श्रवणाने मनाला शांती लाभते आणि जीवनाचे अंतिम उद्दिष्ट समजते, असे प्रतिपादन नागोठणे जिल्हा परिषद गटाचे शिवसेना-आघाडीचे उमेदवार सुमित काते यांनी केले.
नागोठणे येथील श्री जोगेश्वरी माता प्रांगणात श्री रामचरित मानस सेवा संस्थेच्या वतीने आयोजित २३ व्या वार्षिक श्रीमद् भागवत कथेच्या सांगता समारंभात ते बोलत होते.
भव्य कलश यात्रेने प्रारंभ
सोमवार, १९ जानेवारी रोजी शहरातून काढण्यात आलेल्या भव्य कलश यात्रेने या सप्ताहाची सुरुवात झाली. यामध्ये ज्ञाती समाजबांधव आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मंगळवार, २० जानेवारी ते सोमवार, २६ जानेवारी या सात दिवसांच्या कालावधीत नागोठणे परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.
आचार्य मारुती महाराज नंदनजींचे निरूपण

महर्षी वेदव्यासांनी रचलेल्या या पवित्र ग्रंथातील १७,००० हून अधिक श्लोकांचा सारांश आणि भगवान श्रीकृष्णाच्या विविध लीलांचे वर्णन कथाकार आचार्य मारुती महाराज नंदनजी यांनी अत्यंत सोप्या भाषेत भाविकांना उलगडून सांगितले. सात दिवस चाललेल्या या ज्ञानयज्ञाचा लाभ नागोठणे विभागातील हजारो भक्तजनांनी घेतला.
हा धार्मिक सोहळा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष विनोद कुमार दूबे, उपाध्यक्ष राजकुमार गुप्ता, कोषाध्यक्ष ए. के. मिश्रा, सचिव संजय सिंह, निर्देशक बी. एस. यादव, मंच संचालक आर. सी. चौबे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांना कार्यवाहक समितीच्या सदस्यांनी व महिला मंडळाने मोलाचे सहकार्य केले. सप्ताहाची सांगता सोमवारी भव्य महाप्रसादाने करण्यात आली.
“या पवित्र कथेचा लाभ घेण्याचे भाग्य मला लाभले, हे मी माझे पुण्य समजतो. अशा धार्मिक कार्यक्रमांतून समाजात एकोपा आणि सात्विकता निर्माण होते. उत्तर भारतीय बांधवांनी केलेले हे आयोजन स्तुत्य आहे.”
-सुमित काते
(उमेदवार, नागोठणे जि. प. गट)
