‘विकासाच्या लढाईचा संघनायक मीच’; म्हसळा तालुक्यातील प्रचारसभांतून विरोधकांवर टीकास्त्र
म्हसळा । वैभव कळस
“रायगड जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय सत्ता स्थापन होणे केवळ अशक्य आहे. ही निवडणूक केवळ राजकीय नसून विकासाची स्पर्धा आहे. या स्पर्धेचा ‘संघनायक’ मी असून माझे उमेदवार हे मैदानात जिंकून येणारे कसलेले खेळाडू आहेत,” अशा शब्दांत खासदार सुनील तटकरे यांनी आपला आत्मविश्वास व्यक्त केला.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हसळा तालुक्यातील मौजे पाभरे, खरसई आणि मेंदडी येथे आयोजित जाहीर प्रचार सभांमध्ये ते बोलत होते.

‘मी आणि आदितीच उमेदवार आहोत’ असे समजा
पाभरे गटाचे उमेदवार अनिल बसवत, पाभरे गणाच्या समृद्धी संदीप चाचले आणि खरसई गणाचे लहू म्हात्रे यांच्या प्रचारार्थ या सभांचे आयोजन करण्यात आले होते. मतदारांना आवाहन करताना तटकरे म्हणाले की, “या निवडणुकीत स्वतः मी आणि पालकमंत्री आदिती तटकरे उमेदवार आहोत, असे समजून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत चिन्हासमोरील बटण दाबा. आमचा विकास हाच या निवडणुकीचा केंद्रबिंदू असून आमचे उमेदवार जनतेच्या सतत संपर्कात राहणारे सक्रिय कार्यकर्ते आहेत.”
मैदानात चौकार, षटकार आम्हीच मारणार!
विरोधकांवर टीका करताना तटकरे यांनी क्रिकेटच्या रूपकाचा वापर केला. ते म्हणाले, “माझ्या राजकीय संघात बलाढ्य कार्यकर्ते आहेत. विकासाशी काहीही संबंध नसलेले अन्य पक्षांचे उमेदवार केवळ आमची ‘विकेट’ घेण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, या निवडणुकीत चौकार आणि षटकार आम्हीच मारणार, याची मला खात्री आहे. आम्ही सर्व समाजघटकांना सोबत घेऊन धर्मनिरपेक्ष राजकारण करतो, तर विरोधक जाती-पातीचे राजकारण करून फायदा मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.”
विकासाची परंपरा कायम राखण्याचे आवाहन
गाव, वाडी आणि वस्तीपर्यंत पोहोचलेल्या विकासकामांची आठवण करून देत तटकरे यांनी सांगितले की, बहुतांश कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामांच्या पूर्ततेसाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असणे आवश्यक आहे.
या सभेला तालुकाध्यक्ष समीर बनकर, माजी सभापती महादेव पाटील, नाझिम हसवारे, छाया म्हात्रे, युवक अध्यक्ष फैसल गीते, माजी जि.प. सदस्या हिरा बसवत, महिला अध्यक्षा मीना टिंगरे यांच्यासह संदीप चाचले, महेश घोले, सोनल घोले, मजहर काझी, किरण पालांडे आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
