५ फेब्रुवारीला मतदान, ७ फेब्रुवारीला फैसला; राजकीय रणधुमाळीला वेग
उरण । घन:श्याम कडू
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी उरण तालुक्यातील राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. मंगळवारी ३४ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने, आता १२ जागांसाठी एकूण ३९ उमेदवार निवडणूक रिंगणात नशीब आजमावणार आहेत. अर्ज माघारीनंतर आता खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुरळा उडणार असून तालुक्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे.
जागांचे गणित आणि उमेदवारांची संख्या
उरण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ४ आणि पंचायत समितीच्या ८ अशा एकूण १२ जागांसाठी निवडणूक होत आहे. निवडणूक निर्णयाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेच्या ४ जागांसाठी सुरुवातीला २९ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी १३ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता १६ उमेदवार रिंगणात आहेत.
पंचायत समितीच्या ८ जागांसाठी ४६ अर्ज आले होते. त्यापैकी २ अर्ज बाद झाले आणि २१ उमेदवारांनी माघार घेतली. आता २३ उमेदवार मैदानात उरले आहेत.
उरणमध्ये ही निवडणूक प्रामुख्याने महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी थेट आणि अटीतटीची होणार आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीने सत्ताधारी भाजपकडून नगराध्यक्षपद खेचून घेतले होते. त्याच यशाची पुनरावृत्ती महाविकास आघाडी करणार की भाजप आपला गड राखणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता प्रचारासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. गुरुवार, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार असून मतमोजणी शनिवार, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे.
मंगळवारी सकाळपासूनच निवडणूक कार्यालयात उमेदवार आणि समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पक्षांतर, बंडखोरी थोपवणे आणि सोयीचे राजकारण करण्यासाठी हालचालींना वेग आला होता. आता अंतिम उमेदवार निश्चित झाल्यामुळे आजपासूनच गावोगावी प्रचारसभा, पदयात्रा आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात होणार आहे.
उरणचा ‘किल्ला’ कोण लढवणार आणि कोण बाजी मारणार, याचा अंतिम निकाल ७ फेब्रुवारीला स्पष्ट होईल.
