महिला व वृद्धांची वस्ती असलेल्या भागात चोरट्यांचा धुमाकूळ
श्रीवर्धन । अनिकेत मोहित
श्रीवर्धन तालुक्यातील अतिदुर्गम गडबवाडी परिसरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागातील अनेक कुटुंबे रोजगाराच्या निमित्ताने मुंबईत वास्तव्यास असून गावात प्रामुख्याने महिला व वृद्ध नागरिकच राहत आहेत. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत चोरट्यांकडून बंद घरांना लक्ष्य केले जात असल्याचे दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी केळेवाडी गावात घरफोडीचा अयशस्वी प्रयत्न झाल्यानंतर आता गडबवाडी येथे प्रत्यक्ष घरफोडीची घटना उघडकीस आली आहे.
रविवार, दि. २५ जानेवारी २०२६ रोजी सकाळच्या सुमारास गडबवाडी येथील श्री. भागडे यांच्या घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्या वेळी सौ. भागडे या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. घर रिकामे असल्याची संधी साधत चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून महिला व वृद्ध नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी श्रीवर्धन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, अतिदुर्गम व दुर्गम भागात नियमित पोलिस गस्त वाढवावी तसेच घरफोडी करणाऱ्या टोळीचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी गडबवाडी व परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
