जिद्द आणि कष्टाच्या जोरावर रायगडच्या सुपुत्राची ‘राष्ट्रीय’ भरारी; गावात आनंदाचे वातावरण
माणगाव | सलीम शेख
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील कालवण या छोट्याशा गावातील कुणाल सुरेश हर्णेकर याने आपल्या जिद्दीच्या जोरावर कबड्डीच्या मैदानात मोठी झेप घेतली आहे. कुणालची आगामी कुमार गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली असून, या यशामुळे संपूर्ण जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे.
पुण्यातील कामगिरी ठरली निर्णायक
कुणाल सध्या पुणे येथील ‘सतेज संघ, बाणेर’ या संघाकडून खेळत आहे. पुणे येथे २५ ते २९ नोव्हेंबर दरम्यान पार पडलेल्या ५१ व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत कुणालने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. पुणे जिल्हा-पुणे शहर विभागातून खेळताना त्याने दाखवलेल्या अष्टपैलू कामगिरीची दखल घेत निवड समितीने त्याची महाराष्ट्र संघात वर्णी लावली आहे.
विजयवाड्यात दाखवणार खेळाचा दम
आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे १५ ते १८ जानेवारी दरम्यान ५१ वी कुमार गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत कुणाल महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. ग्रामीण भागातील मर्यादित साधनांवर मात करत कुणालने गाठलेला हा टप्पा तरुण खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
कुणालचा प्रवास अतिशय संघर्षाचा राहिला आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण कालवणच्या जिल्हा परिषद शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण नालासोपारा येथील राजा शिवाजी विद्यालयात पूर्ण झाले. सध्या तो भाईंदरच्या अभिनव कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. शिक्षण आणि सराव यांचा योग्य ताळमेळ राखत, आर्थिक अडचणींना न डगमगता त्याने हे यश मिळवले आहे.
“कुणालच्या या यशामध्ये त्याचे प्रशिक्षक, शिक्षक आणि कुटुंबीयांचा मोठा वाटा आहे. जिद्द आणि मेहनत असेल तर ग्रामीण भागातील खेळाडूही राष्ट्रीय स्तरावर चमकू शकतो, हे त्याने सिद्ध केले आहे.”
कुणालच्या या यशाबद्दल कालवण गावासह संपूर्ण रायगड जिल्ह्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रीय स्पर्धेतही तो आपली छाप पाडेल, अशी खात्री क्रीडाप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.
