• Thu. Jan 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

तटकरेंची ‘धोबीपछाड’! म्हसळ्यात शिंदे गटाला मोठा धक्का; ७ नगरसेवक अपात्र ठरवत जिल्हाधिकाऱ्यांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’

ByEditor

Jan 29, 2026

पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत जिल्हाधिकारी किशन जावळे यांचा धडाकेबाज निकाल; भरत गोगावलेंना राजकीय फटका

म्हसळा । वैभव कळस
रायगड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या ‘साहेब’ विरुद्ध ‘शेठ’ असा जोरदार संघर्ष पाहायला मिळत असून, म्हसळा नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांना जबरदस्त ‘धोबीपछाड’ दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करून पक्षादेशाचे उल्लंघन करणाऱ्या म्हसळ्यातील ७ नगरसेवकांना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अपात्र घोषित केले आहे. या धडक निर्णयामुळे शिंदे गटाला जिल्ह्यात मोठा राजकीय फटका बसला असून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

कायदेशीर लढाईत तटकरेंचा ‘मास्टरस्ट्रोक’

काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीच्या ७ नगरसेवकांनी पक्षांतर करत शिंदे गटाची वाट धरली होती. या पक्षांतरामुळे म्हसळ्यातील राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला धक्का लागला होता. मात्र, खासदार सुनील तटकरे यांनी अत्यंत शांतपणे कायदेशीर लढाई लढत या नगरसेवकांविरुद्ध माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे गटनेते संजय कर्णिक यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे अपात्रतेचा अर्ज दाखल केला होता. या प्रदीर्घ सुनावणीत अखेर तटकरेंच्या रणनीतीचा विजय झाला असून, मंत्री भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचे बळ घटले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा ऐतिहासिक निकाल

जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी ‘महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६’ मधील कलम ३(२) आणि १९८७ च्या नियम ८(१) मधील तरतुदींनुसार हा निकाल दिला. पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन झाल्याचे कायदेशीररीत्या सिद्ध झाल्याने या सातही सदस्यांचे पद रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अलिबाग येथे २७ जानेवारी २०२६ रोजी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

अपात्र ठरलेले ७ ‘माजी’ नगरसेवक:
१. श्रीम. कमल रवींद्र जाधव
२. श्रीम. मेहजबिन नदीम दळवी
३. श्री. असलह असलम कादिरी
४. श्रीम. फरहीन अ. अजीज बशारद
५. श्रीम. सुमैया कासम आमदानी
६. श्रीम. सारा अ. कादीर म्हसलाई
७. श्री. शाहिद सईद जंजिरकर

निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणे बदलली

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तोंडावर हा निकाल आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. या निर्णयामुळे म्हसळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची पकड पुन्हा एकदा घट्ट झाली आहे. दुसरीकडे, भरत गोगावले यांच्यासाठी हा मोठा मानहानीकारक पराभव मानला जात असून, जिल्ह्याच्या आगामी राजकारणात याचे मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!