घरात एकटे असल्याचा फायदा घेत जबरी चोरी; रेवदंडा परिसरात खळबळ
रेवदंडा | सचिन मयेकर
चौल येथील टेकाळकर आळीमध्ये एका ७० वर्षीय वृद्ध महिलेची घरात घुसून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंदा प्रमोद म्हात्रे असे मृत महिलेचे नाव असून, अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने लुटण्यासाठी केलेल्या झटापटीत त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण अलिबाग तालुक्यात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
मंदा म्हात्रे या गेल्या १० वर्षांपासून टेकाळकर आळी येथील आपल्या माहेरच्या घराची देखरेख करण्यासाठी तिथे एकट्याच वास्तव्यास होत्या. त्यांचे पती प्रमोद म्हात्रे हे अलिबाग तालुक्यातील नवगाव (गुंजीस) येथे राहतात. २८ जानेवारी रोजी सकाळी ९:३० वाजेपर्यंत पती-पत्नीचा फोनवर संवाद झाला होता. मात्र, त्यानंतर मंदा म्हात्रे फोन उचलत नसल्याने पतीला संशय आला. रात्री ८ च्या सुमारास प्रमोद म्हात्रे यांनी चौल येथील घरी धाव घेतली असता, घराचा मागील दरवाजा उघडा दिसला. आत प्रवेश केला असता मंदा म्हात्रे या स्वयंपाकघरात मृतावस्थेत आढळून आल्या.
घटनेची माहिती मिळताच रेवदंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात मृतदेहाच्या मानेवर वळ आणि कानाखाली जखमा दिसून आल्या आहेत. चोरट्यांनी त्यांच्या कानातील सोन्याच्या रिंगा आणि गळ्यातील माळ जबरदस्तीने हिसकावून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या झटापटीतच चोरट्यांनी त्यांचा गळा आवळून खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) माया मोरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. श्वान पथक आणि फॉरेन्सिक तज्ञांना पाचारण करण्यात आले असून पुराव्यांची साक्ष घेण्यात आली आहे.
या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३/१, ३११ आणि ३३१(७) नुसार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा (रजि. नं. १२/२०२६) नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भैरू किसन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रेवदंडा पोलीस करीत आहेत.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि संशयास्पद हालचालींची तपासणी पोलीस करत असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
