श्रीवर्धन । अनिकेत मोहित
श्रीवर्धन शहरातील सरकारी रुग्णालयाच्या मागील पोतदार चाळ परिसरात सोमवारी (दि. १६ मार्च) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दोन घरांचे कडी-कोयंडे तोडून घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
माहितीनुसार, सरकारी रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या पोतदार चाळ परिसरात नेहमीच रहिवाशांची वर्दळ असते. मात्र सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दोन घरांचे दरवाजे फोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारल्याची माहिती समोर येत आहे.
सकाळी घरमालक व शेजाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून परिसरातील नागरिकांकडून माहिती घेतली जात आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, श्रीवर्धन शहरात अलीकडे चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत
