• Wed. Mar 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण नगरपालिकेत सत्ताधारी-विरोधकांत ठिणगी; पहिल्याच सभेत ७ महत्त्वाचे ठराव नामंजूर

ByEditor

Mar 18, 2026

उरण (घन:श्याम कडू): उरण नगरपरिषदेच्या नव्या कार्यकाळातील पहिल्याच सर्वसाधारण सभेत राजकीय संघर्षाचा अंक पाहायला मिळाला. नगराध्यक्षांकडे सत्ता असूनही सभागृहात भाजपचे बहुमत असल्याने विकासाच्या १० पैकी तब्बल ७ महत्त्वाच्या ठरावांना ब्रेक लागला आहे. या राजकीय पेचप्रसंगात शहराचा विकास रखडल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून, नगराध्यक्षांनी प्रशासनाविरुद्ध थेट रणशिंग फुंकले आहे.

राजकीय गणितात विकास रखडला

उरण पालिकेचे सध्याचे समीकरण अत्यंत क्लिष्ट आहे. नगराध्यक्षा भावना घाणेकर यांच्यासह ९ नगरसेवक महाविकास आघाडीचे आहेत, तर १२ नगरसेवकांसह भाजपचे संख्याबळ जास्त आहे. मंगळवारी झालेल्या सभेत भाजपने बहुमताच्या जोरावर मूलभूत सुविधांचे ठराव फेटाळून लावले. यामध्ये कचरा व्यवस्थापन व नालेसफाई, पथदिवे उभारणी व पाणी गळती दुरुस्ती, स्मशानभूमीमध्ये शेगड्या बसवणे या महत्त्वाच्या कामांचा समावेश होता.

केवळ ‘नमो उद्यान’ आणि काही प्रशासकीय प्रक्रियांनाच मंजुरी मिळाली आहे. पावसाळा तोंडावर असताना नालेसफाई आणि गटार दुरुस्तीचे काम रखडल्याने शहरात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

नगराध्यक्षांचा मुख्याधिकाऱ्यांवर खळबळजनक आरोप

सभेतील गोंधळानंतर नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्याधिकारी समीर जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले. “मुख्याधिकारी कोणतेही सहकार्य करत नाहीत. महिला नगराध्यक्ष म्हणून माझे मानसिक खच्चीकरण केले जात आहे,” असा दावा त्यांनी केला.

“नगरपरिषदेत ‘मेलेल्या प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे’ प्रकार सुरू आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून एकही ठोस विकासकाम झाले नसून, प्रशासनाकडून कागदपत्रे लपवली जात आहेत,” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.

पायऱ्यांवर बसून आंदोलन; नगरविकास मंत्र्यांकडे धाव

प्रशासकीय असहकार आणि विरोधकांच्या आडमुठ्या धोरणामुळे संतप्त झालेल्या नगराध्यक्षा व महाविकास आघाडीच्या महिला नगरसेविकांनी नगरपरिषद कार्यालयाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केले. या संपूर्ण प्रकरणाची तक्रार राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचे घाणेकर यांनी स्पष्ट केले आहे. जर प्रशासकीय कामात सुधारणा झाली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!