श्रीवर्धन (प्रतिनिधी): श्रीवर्धन-हरिहरेश्वर मार्गावरील जसवली तळे परिसरात एका अवजड यंत्रणा असलेल्या ट्रॅक्टरने इलेक्ट्रिक कारला धडक दिल्याने भीषण अपघात घडला. नायरा पेट्रोल पंपाजवळ झालेल्या या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे रस्त्यावरील वाहतूक सुरक्षा आणि अवजड वाहनांच्या नियमावलीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित इलेक्ट्रिक कार श्रीवर्धनच्या दिशेने जात असताना पेट्रोल पंपातून एक ट्रॅक्टर अचानक मुख्य रस्त्यावर आला. या ट्रॅक्टरला क्रेन आणि ड्रिल मशीनसारखी अवजड यंत्रणा जोडलेली होती. ट्रॅक्टर चालकाच्या निष्काळजीपणामुळे ही यंत्रणा थेट कारवर आदळली. धडक इतकी जोरदार होती की कारचा पुढचा भाग पूर्णतः चक्काचूर झाला. सुदैवाने, कारमधील प्रवासी बालंबाल बचावले.
अपघातानंतर श्रीवर्धन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघातग्रस्त ट्रॅक्टर आणि त्याच्या चालकाला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. या घटनेची अधिकृत नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, स्थानिक नागरिकांनी दोषी चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या अपघाताने केवळ निष्काळजीपणाच नाही, तर रस्ते वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघनही समोर आणले आहे. सार्वजनिक रस्त्यावर क्रेन आणि ड्रिल मशीनसारख्या अवजड यंत्रणांसह ट्रॅक्टर चालवण्याची रीतसर परवानगी होती का?, ट्रॅक्टर चालकाकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स होते का? तसेच वाहनाची नोंदणी आणि विमा नियमांनुसार वैध आहे का?, मुख्य रस्त्यावर प्रवेश करताना अशा अवजड वाहनांनी पाळायचे नियम धाब्यावर बसवले गेले होते का? असे अनेक प्रश्न या अपघातानंतर उपस्थित झाले आहेत.
“आज सुदैवाने कुणाचा जीव गेला नाही, पण अशा अवजड यंत्रणांची रस्त्यावरील अनियंत्रित वाहतूक भविष्यात मोठ्या दुर्घटनेला निमंत्रण देऊ शकते. प्रशासनाने यावर कडक निर्बंध घालावेत,” अशी भावना जसवली परिसरातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
