• Wed. Mar 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

धाटावमधील ‘ट्रान्सवर्ल्ड फर्टिकेम’ कंपनीत आगीचा भडका; कुलिंग टॉवर जळून खाक

ByEditor

Mar 18, 2026
Oplus_16908288

धाटाव/रोहा (शशिकांत मोरे): रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमधील खत उत्पादनात अग्रेसर असलेल्या ‘ट्रान्सवर्ल्ड फर्टिकॅम’ कंपनीत बुधवारी सायंकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. इमारतीच्या टेरेसवर असलेल्या कुलिंग टॉवरला ही आग लागली असून, यामध्ये टॉवरसह इमारतीवरील साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी कंपनीच्या उंच इमारतीवरील कुलिंग टॉवरला अचानक आग लागली. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. आगीमुळे परिसरात काळ्या धुराचे प्रचंड लोट पसरले होते. या धुराचा त्रास धाटाव परिसरातील गावांना आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागला. घटनेची माहिती मिळताच धाटाव अग्निशमन दलाने तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

या आगीत कंपनीचा कुलिंग टॉवर पूर्णपणे जळून खाक झाला असून इमारतीवरील इतर तांत्रिक साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र यामध्ये मोठी आर्थिक हानी झाली असल्याचे समोर आले आहे.

सुरक्षा सप्ताहाच्या औचित्यावरच प्रश्नचिन्ह

विशेष म्हणजे, औद्योगिक वसाहतीमध्ये नुकताच ‘सुरक्षा सप्ताह’ साजरा करण्यात आला होता. या सप्ताहाच्या माध्यमातून कारखान्यांमधील सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर लगेचच घडलेल्या या आगीच्या घटनेमुळे धाटावमधील कारखाने खरोखरच सुरक्षित आहेत का? असा गंभीर प्रश्न स्थानिक रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

औद्योगिक वसाहतीमधील आगीच्या वाढत्या घटनांमुळे लगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने या कंपन्यांच्या ऑडिटकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!