• Wed. Mar 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

इराण-इस्रायल युद्धाचा फटका अष्टविनायकाला; गॅस टंचाईमुळे पालीतील बल्लाळेश्वर देवस्थानचे अन्नछत्र ठप्प

ByEditor

Mar 18, 2026

पाली (प्रतिनिधी): जागतिक स्तरावरील इराण-इस्रायल संघर्षाचे पडसाद आता थेट अष्टविनायक तीर्थक्षेत्राच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचले आहेत. कमर्शियल गॅस सिलिंडरचा पुरवठा खंडित झाल्याने पाली येथील श्री बल्लाळेश्वर देवस्थानचे प्रसिद्ध अन्नछत्र आणि लाडू प्रसाद उत्पादन पूर्णपणे बंद पडले आहे. ऐन उन्हाळी सुट्ट्यांच्या हंगामात हजारो भाविकांना महाप्रसादापासून वंचित राहावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

पाली हे अष्टविनायकातील महत्त्वाचे स्थान असून, येथे दररोज देशभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. देवस्थानतर्फे अवघ्या ३० रुपयांत सात्विक भोजन दिले जाते. सामान्य दिवसांत सुमारे ४००, तर सुट्ट्यांच्या काळात ८०० हून अधिक भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात. मात्र, गॅसअभावी ही सेवा ठप्प झाल्याने भाविकांना नाईलाजास्तव बाहेरील हॉटेल्समध्ये अव्वाच्या सव्वा पैसे मोजून जेवण करावे लागत आहे.

लाडू प्रसादही मिळेनासा

अन्नछत्रासोबतच भाविकांची विशेष पसंती असलेला देवस्थानचा ‘प्रसादाचा लाडू’ देखील सध्या उपलब्ध नाही. मोठ्या प्रमाणात लाडू तयार करण्यासाठी लागणारा गॅस पुरवठा थांबल्याने हे उत्पादन बंद करण्यात आले आहे. भाविकांना केवळ दर्शन घेऊनच समाधान मानावे लागत असून, नैवेद्य आणि प्रसादासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे.

‘लाकूड वापरणे अशक्य’; प्रशासनाची हतबलता

मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक करण्यासाठी लाकडाचा वापर करणे तांत्रिकदृष्ट्या कठीण असून, यामुळे प्रदूषणाची समस्याही उद्भवू शकते, असे देवस्थान प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे गॅसशिवाय दुसरा कोणताही पर्याय सध्यातरी उपलब्ध नाही.

“भाविकांच्या सोयीसाठी आम्ही कमर्शियल गॅसचा वापर करतो, मात्र सध्या पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने अन्नछत्र चालवणे अशक्य झाले आहे. शासनाने विशेष बाब म्हणून देवस्थानला गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिल्यास आम्ही तात्काळ ही सेवा पुन्हा सुरू करू शकतो.”
— जितेंद्र गद्रे, अध्यक्ष, श्री बल्लाळेश्वर देवस्थान.

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे भाविकांची गर्दी वाढत आहे. अशा वेळी भाविकांची ही गैरसोय टाळण्यासाठी राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून गॅस पुरवठ्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी जोर धरत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!