• Thu. Mar 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाडच्या ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाचा उद्या ९९ वा वर्धापन दिन; लाखो अनुयायांच्या उपस्थितीत होणार ‘समता जागर’

ByEditor

Mar 19, 2026

राज्य सरकार व प्रशासनाकडून जय्यत तयारी; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह दिग्गज मान्यवरांची उपस्थिती

महाड । मिलींद माने
भारतीय सामाजिक क्रांतीचा मैलाचा दगड ठरलेल्या महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाचा ९९ वा वर्धापन दिन उद्या, २० मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा संदेश देण्यासाठी पुकारलेल्या या ऐतिहासिक लढ्याला वंदन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी महाडमध्ये दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनाकडून सर्व प्रकारची जय्यत तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि महत्त्व

२० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्यावर हजारो अनुयायांसह जाऊन पाणी प्राशन केले होते. हा केवळ तळ्यातील पाणी पिण्याचा प्रसंग नव्हता, तर अस्पृश्यांना मानवी हक्क मिळवून देणारा आणि सामाजिक विषमतेच्या बेड्या तोडणारा ‘पाण्याचा रणसंग्राम’ होता. या घटनेने दलितांमध्ये स्वाभिमानाची जाणीव निर्माण केली. याच आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात २५ डिसेंबर १९२७ रोजी विषमतेचे प्रतीक असलेल्या ‘मनुस्मृती’चे दहन करण्यात आले होते.

प्रशासकीय नियोजन आणि कार्यक्रम

या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्हा प्रशासन आणि महाड नगरपालिकेकडून चवदार तळे परिसर आणि क्रांती स्तंभ परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांच्यासह अनेक मंत्री व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. क्रांती स्तंभ परिसरात भव्य सभा मंडप उभारण्यात आला असून सकाळी ९ वाजल्यापासून विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

‘सामाजिक सक्षमीकरण दिन’

दरवर्षी २० मार्च हा दिवस ‘सामाजिक सक्षमीकरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. “पाणी पिऊन कोणी अमर होत नाही, पण मानवी हक्कांच्या रक्षणासाठी दिलेला हा लढा न्यायाचा आहे,” हा बाबासाहेबांचा संदेश आजही कोट्यवधी जनतेसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

या महोत्सवासाठी महाड शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, येणाऱ्या अनुयायांसाठी पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि निवासाची उत्तम सोय करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!