• Fri. Mar 20th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणमध्ये गॅस टंचाईचा भडका; १९०० रुपयांचा सिलेंडर ४५०० ला!

ByEditor

Mar 20, 2026

आखाती युद्धाचा हॉटेल व्यवसायाला फटका; काळाबाजार तेजीत असल्याने अनेक हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर

उरण | घनश्याम कडू
जागतिक घडामोडींचे पडसाद आता थेट उरणच्या स्थानिक अर्थकारणावर उमटू लागले आहेत. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, उरणमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. या टंचाईचा फायदा घेत काळाबाजार करणाऱ्यांनी डोके वर काढले असून, तब्बल १९०० रुपयांचा सिलेंडर ४००० ते ४५०० रुपयांना विकला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हॉटेल व्यवसाय संकटात

गॅसअभावी उरणमधील अनेक हॉटेल्सचे स्वयंपाकघर थंड पडले आहे. काही व्यावसायिकांनी नाईलाजाने आपली दुकाने बंद ठेवली आहेत, तर काही जण अव्वाच्या सव्वा दराने गॅस खरेदी करून व्यवसाय टिकवण्याची धडपड करत आहेत.

“पुढील दोन दिवसांत गॅसचा पुरवठा सुरळीत झाला नाही, तर चहा, नाश्ता आणि जेवण बंद करून फक्त थंडपेये विकण्याची वेळ आमच्यावर येईल,” अशी उद्विग्न प्रतिक्रिया एका हॉटेल चालकाने दिली.

काळाबाजार आणि अनधिकृत प्रकार

बाजारात अधिकृत दर १९०० रुपये असताना, गॅस एजन्सीकडून सिलेंडर मिळत नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. मात्र, दुसरीकडे काळ्या बाजारात अडीचपट किमतीत गॅस उपलब्ध होत आहे. तसेच, घरगुती सिलेंडरमधून बेकायदेशीररीत्या गॅस व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरून (रिफिलिंग) विकले जात असल्याची चर्चाही उरणमध्ये रंगली आहे. यामुळे सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

पर्यायांचा शोध, पण खर्च अफाट

गॅस नसल्याने काही व्यावसायिकांनी चूल किंवा इंडक्शन शेगडीचा पर्याय निवडला आहे. मात्र, लाकडांचे वाढलेले दर आणि विजेचे बिल यामुळे हा खर्च परवडणारा नसल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. केवळ व्यावसायिकच नव्हे, तर घरगुती सिलेंडरचा पुरवठाही संथ झाल्याने सामान्य नागरिक हैराण झाले आहेत.

प्रशासनाचे दावे आणि वास्तव

एकिकडे शासकीय यंत्रणा गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याचा आणि काळाबाजार होत नसल्याचा दावा करत आहेत. मात्र, प्रत्यक्ष बाजारात व्यावसायिक आणि नागरिक हवालदिल झाले आहेत. प्रशासनाचे दावे आणि जमिनीवरील वास्तव यात मोठी तफावत असल्याने, या प्रकरणाची सखोल चौकशी करून काळाबाजार थांबवण्याची मागणी जोर धरत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!