• Fri. Mar 20th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

म्हसळा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल; ११ ग्रामपंचायतींसाठी रणसंग्राम, २८ एप्रिलला मतदान

ByEditor

Mar 20, 2026

३ ग्रामपंचायतींत पोटनिवडणुका; राजकीय हालचालींना वेग, ३० मार्चला प्रसिद्ध होणार अधिकृत नोटीस

म्हसळा | वैभव कळस
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार म्हसळा तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा आणि ३ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या घोषणेमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून, इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला वेग दिला आहे.

निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम:

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, तहसीलदार कार्यालयामार्फत ३० मार्च २०२६ रोजी निवडणुकीची अधिकृत नोटीस प्रसिद्ध केली जाईल. प्रक्रियेचे महत्त्वाचे टप्पे खालीलप्रमाणे आहेत:

  • नामनिर्देशनपत्रे स्वीकारणे: ७ एप्रिल ते १३ एप्रिल २०२६
  • अर्जांची छाननी: १४ एप्रिल २०२६
  • अर्ज मागे घेण्याची मुदत: १५ एप्रिल २०२६
  • चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी: १७ एप्रिल २०२६
  • मतदान: २८ एप्रिल २०२६
  • मतमोजणी व निकाल: २९ एप्रिल २०२६

‘या’ ग्रामपंचायतींमध्ये होणार निवडणूक

सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात तालुक्यातील मांदाटणे, तुरुंबाडी, आंबेत, मेंदडी, रोहिणी, कोळे, खामगाव, खारगाव खुर्द, खारगाव बुद्रुक, गोंडघर आणि चिखलप या ११ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर केल्टे, पाभरे आणि लिपणीवावे या ३ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका पार पडणार आहेत.

राजकीय वारे वाहू लागले

उन्हाळ्याच्या तडाख्यासोबतच म्हसळ्यात आता निवडणुकीची उष्णताही वाढणार आहे. ग्रामीण भागातील सत्तेचे केंद्र मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकवण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी आणि स्थानिक आघाड्यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या या मतदानाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!