निवडणूक यंत्रणेसह पोलीस दल सज्ज; १९४ मतदान केंद्रांवर चोख बंदोबस्त
धाटाव | शशिकांत मोरे
रोहा तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेच्या ४ जागा आणि पंचायत समितीच्या ८ जागांसाठी आज, ७ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. या ‘मिनी मंत्रालया’च्या सत्तेसाठी संपूर्ण तालुक्यातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, ग्रामीण भागातील साधारण १ लाख २५ हजार ७६३ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
तालुक्यात एकूण १९४ मतदान केंद्रे असून त्यांची विभागणी खालीलप्रमाणे करण्यात आली आहे:
नागोठणे गट: ४२ मतदान केंद्रे (सुकेळी आणि नागोठणे गण प्रत्येकी २१).
आंबेवाडी गट: ४९ मतदान केंद्रे (कोलाड गण २८, आंबेवाडी गण २१).
भुवनेश्वर गट: ४३ मतदान केंद्रे (धाटाव गण २०, भुवनेश्वर गण २३).
घोसाळे गट: ६० मतदान केंद्रे (न्हावे गण २८, तर घोसाळे गणात सर्वाधिक ३२ केंद्रे).
निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे
रोहा पोलीस ठाण्यामार्फत १ निरीक्षक, २ सहाय्यक निरीक्षक, ३ उपनिरीक्षक, ८० पोलीस कर्मचारी आणि १०० होमगार्ड्सचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. प्रत्येक केंद्रावर ५ कर्मचारी, १ केंद्राध्यक्ष, ३ मतदान अधिकारी आणि १ शिपाई अशी यंत्रणा कार्यरत असेल.
तालुक्यातील नागोठणे, आंबेवाडी, भुवनेश्वर आणि घोसाळे या जिल्हा परिषद गटांसह कोलाड, धाटाव, न्हावे या पंचायत समिती गणांमध्ये कोणाचे वर्चस्व राहणार, याचा फैसला आज मतपेटीत बंद होणार आहे. प्रशासनाने मतदारांना निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
